पहिल्या पाणंद रस्त्यासह आदिवासी बांधवांसाठी योजनांचा पाऊस
ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दुर्गम भागातील कातकरी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी थेट घरपोच दाखले देण्यापासून सात शाळांना संगणक संच उपलब्ध करून देण्यापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्षात आणले.
याच दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पाणंद रस्त्याचे उद्घाटन आणि लोकसहभागातून तलावांतील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शानदार शुभारंभ करण्यात आला.
कसारा बुद्रुक येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि शहापूर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, जन्माचा दाखला नसल्यामुळे आजवर अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या कातकरी आदिवासी समाजातील मुलांना प्रशासकीय तत्परतेमुळे जागेवरच घरपोच जन्मदाखले सुपूर्द करण्यात आले. डिजिटल युगात कातकरी पाड्यावरील विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून मागे राहू नयेत, म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या पुढाकाराने आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कातकरी पाड्यावरील सात शाळांना अत्याधुनिक संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. या भव्य शिबिरात सामाजिक न्याय विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, आदिवासी विकास विभाग आणि सातबारा दुरुस्ती यांसारख्या शासनाच्या तब्बल ३० विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली शेकडो ग्रामीण नागरिकांनी घेतला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्रशासनाने मागील अवघ्या तीन महिन्यांत नऊ विविध शिबिरांचे यशस्वी आयोजन करून साधारणतः १३ हजार गरजू लोकांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. शहापूर तालुक्यात प्रशासनाने राबविलेल्या ‘घोंगडी बैठक’ या अभिनव आणि थेट संवाद साधणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. प्रशासनाच्या या गतिमान आणि संवेदनशील कामाबद्दल आमदार दौलत दरोडा, स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी, । तालुका निरीक्षक भूमी अभिलेख आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याच विशेष संकल्पनेतून आणि आमदार दौलत दरोडा यांच्या साथीने उंबरमाळी ते कातकरी पाडा या ‘मुख्यमंत्री पानंद रस्ते’ योजनेचे उद्घाटन करण्यात आले. व्यवसायिक सामाजिक बांधिलकी (सीएसआर) निधी आणि स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून साकारलेला हा ठाणे जिल्ह्यातील पहिला पानंद रस्ता ठरला असून, यामुळे परिसरातील १०० एकर शेतीचा प्रश्न सुटणार आहे आणि सुमारे २०० ते ३०० शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे सोपे होणार आहे. याशिवाय, जिल्हाधिका-यांच्या कल्पकतेतून ‘महाराजा स्व अभियान’ अंतर्गत तालुक्यातील चार प्रमुख ठिकाणी तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेची घोषणा करण्यात आली. यातील उंबरमाळी आणि खातिवली येथील गावतलावांतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.