गुवाहाटी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 50 आमदार घेऊन गेल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. पण, शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईपासून वाचवायचे असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते, पण तो गट एखाद्या पक्षात विलिन व्हावा लागतो. अन्यथा बहुमत असूनही कारवाई होऊ शकते, असे शिवसेनेचे वकील म्हणाले होते. यातच, शिंदे गट मनसेत सामील होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चांवर शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचा गट आहे, जे उरलेले 14 आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते त्यांनी ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही, आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे” असं केसरकर म्हणाले.
केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ‘बंडखोरी करणाऱ्या आमदारांचे शंभर बाप आहेत’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. याबाबत देखील दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ”संजय राऊत यांनी आमच्या मातांचा अपमान केलाय. कोणत्याही पक्षाला संजय राऊत यांच्यासारखा प्रवक्ता मिळून नये. पक्षासाठी रक्त सांडलेल्या लोकांची संजय राऊत नाचक्की करतात. राऊतांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. संजय राऊत यांच्यासारखे प्रवक्ते मिळाले तर शिवसेना कधीच वाढणार नाही,” असेही केसरकर म्हणाले.