ठाण्यातील निवासस्थानी आमदारांनी घेतली भेट
ठाणे : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढली गेली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच व्हावे अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांनी केली आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी आलेल्या सर्व आमदारांनी राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच करावे अशा भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा मिळवत राज्यात दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून मान मिळवला. रविवारी शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली असून यामध्ये राजेश क्षीरसागर, चंदगड विधानसभा अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि कोल्हापूर आमदार चंद्रदिप नरके, दिपक केसरकर, संजय मंडलिक, धर्यशील माने, वक्फ बोर्डचे चेअरमन आणि राज्यमंत्री समीर काजी, संजय शिरसाठ, जोगेंद्र कवाडे, आमदार शांताराम मोरे आदी आमदारांचा समावेश होता.
यावेळी शिंदेच्या भेटीला आलेल्या आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्याकडे संख्याबळ आहे आणि फार कमी मताने आमचे तीन-चार आमदार पडले, नाहीतर आम्ही ६५ ते ६६ पर्यंत पोहोचलो असतो. महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या कामांनी भुरळ घातलेली आहे, त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या लोकांची भावना आणि अपेक्षा आहे कि पुन्हा संधी मिळाली पाहिजे, अशी भावना आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.
महायुतीच्या यशात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मोठा हातभार आहे. त्यामुळे मित्र पक्ष म्हणून आम्हाला एकही जागा मिळाली नाही, महायुतीची सत्ता येत आहे, आता त्यांनी सत्तेमध्ये आम्हाला सहभागी करून घ्यावे अशी अपेक्षा जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली.
रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. निश्चितपणे खात्री आहे की आदरणीय मोदी आणि अमित शहा एकत्र मिळून मुख्यमंत्रीपदाबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.