एकनाथ शिंदे यांनी देऊन टाकला कोरा चेक! बँकेत टाकण्यापूर्वीच भाजपाकडून आभार

* मुख्यमंत्री पदाचा दावा एकनाथ शिंदे यांनी सोडला

ठाणे: शिवसेनेत उठाव केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आमच्या पाठी पहाडासारखे उभे राहिले. त्यांच्या सहकार्याने गेल्या अडीच वर्षातमुख्यमंत्री म्हणून केलेली विकासकामे आणि कल्याणकारी योजनांबाबत मी समाधानी आहे. त्यामुळे नवीन मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आमच्यासाठीही अंतिम असेल, असे स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा अखेर सोडला आहे. या निर्णयामुळे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर सध्या मुख्यमंत्री पदावरून तिढा निर्माण झाला होता. सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून दबाव आणला जात होता. या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारीच आपल्या पदाचा राजीनामा देत काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली आहे. पण त्यांची पुढची रणनिती काय याबाबत गुढ निर्माण झाले होते. यासर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी त्यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नसल्याचा संदेश अप्रत्यक्षपणे दिला.

गेल्या अडीच वर्षात राज्याचा मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन बनून सामान्य जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली. लाडके भाऊ, शेतकरी, लाडक्या बहिणी अशा सर्व घटकांसाठी काही ना काही करायचे होते. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांना हे कळणार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. अडीच वर्षाच्या काळात ठप्प पडलेल्या विकास कामांना गती दिली. जनतेचे प्रश्न सोडवले. राज्य पुन्हा एक नंबरवर आणले. जीव तोडून काम केले आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत जनेतसाठी काम करत राहिन. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी कुठेही घोडे अडलेले नाही. मी मोकळ्या मनाचा माणूस आहे. ताणून ठेवणारा नाही. मला सर्व पदांपेक्षा लाडका भाऊ हे पद मोठे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेत उठाव केला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आमच्यामागे पहाडासारखे उभे राहिले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. दिल्लीच्या मदतीने राज्याचा विकास करता आला. त्यामुळे यापुढेही महायुतीचे आणि एनडीएचे प्रमुख म्हणून ते मुख्यमंत्रीपदासाठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबत आपण त्यांच्याशी दूरध्वनीवरून आधीच संपर्क साधला असून कोणताही स्पीड ब्रेकर नसल्याची ग्वाही दिली आहे.

उद्या मोदी, शाह यांच्यासोबत आपल्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक आहे. त्या बैठकीत सरकार संदर्भात निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ईव्हीएमला दोष देणे चुकीचे

कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा ईव्हीएम सेट नव्हती. लोकसभेतही नव्हती. पण आता विरोधकांना जनतेने नाकारले. त्यांच्या मनासारखे झाले नाही, म्हणून ईव्हीएमवर खापर फोडले जात आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.