एकनाथ शिंदे, आव्हाड यांची राजकीय धुळवड
ठाणे : दोन वर्षानंतर राज्य सरकारने होळी-रंगपंचमी सणावरील निर्बंध हटवल्याने ठाण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. निवडणुका आल्या की रंग दाखवू, असे प्रतिपादन करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तर भाजपवर टीका करत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक रंगांची उधळण केली.
यंदा कोरोना महामारीचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे ठाणे शहरात होळी आणि रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलात होळी आणि धुलिवंदनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच रंगांची उधळण करीत आनंद लुटला.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या कुटुंबियांसह टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर धुलीवंदनाचा आनंद लुटला. ‘धर्मवीर आनंद दिघे यांनी होळी आणि धुळवड ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरु केली. त्यांनी सुरू केलेला उपक्रम, परंपरा पुढे नेण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. शिंदे यांनी सांगितले. या वर्षी आणखी वेगळा आनंद आहे. नातू रुद्रांश याचा पहिलाच होळीचा सण असून त्याच्या सोबत होळी खेळताना आमच्या कुटुंबाला वेगळा आनंद झाला असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकात कसा रंग असेल असा प्रश्न विचारला असता, निवडणूक आल्या की, रंग दाखवू असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले.
दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. कुणाच्या आयुष्याचा बेरंग करू नये, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी ईडीकडून होत असलेल्या कारवाईबाबत मत व्यक्त केले. पाचपाखाडी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयाच्या आवारात त्यांनी कार्यकर्त्यांसह धुलीवंदनाचा आनंद घेतला. यावेळी त्यांना गाणे गाण्याचा मोहही आवरता आला नाही. त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर रंगांची उधळण करीत होळीच्या गाण्यावर ठेका देखील धरला.