प्रो कबड्डीचा आठवा हंगाम आजपासून

करोनाच्या साथीचे आव्हान पेलत प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बुधवारपासून बेंगळूरुच्या हॉटेलमध्ये रंगणार असून, याकरिता १२ संघ सज्ज झाले आहेत. हे सामने जैव-सुरक्षा परिघात होणार असून, प्रेक्षकांना ते टेलिव्हिजनवरच पाहता येणार आहेत.

माजी विजेते यू मुंबा आणि बेंगळूरु बुल्स यांच्यातील सामन्यात आठव्या हंगामाला प्रारंभ होईल. त्यानंतर तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायव्हाज या दाक्षिणात्य संघांमधील झुंज रंगेल, तर तिसरा सामना गतविजेते बंगाल वॉरियर्स आणि यूपी योद्धा यांच्यात होईल. यंदाच्या प्रो कबड्डीत चाहत्यांना तिहेरी सामन्यांची लज्जतसुद्धा अनुभवता येणार आहे. हंगामाच्या प्रारंभीचे चार दिवस व त्यानंतर प्रत्येक शनिवारी तीन सामने होणार आहेत.

यू मुंबाविरुद्धच्या लढतीत बेंगळूरु बुल्सची मदार सातव्या हंगामात सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या पवन कुमार शेरावतवर असेल. बेंगळूरु संघात अनुभवी चंद्रन रंजितचा समावेश आहे. यू मुंबाची भिस्त फझल अत्राचालीच्या बचावावर आणि अभिषेक-अजित या युवा चढाईपटूंच्या आक्रमणावर आहे. तमिळ थलायव्हाजविरुद्धच्या लढतीत तेलुगू टायटन्सचे सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार गुणांचा सपाटा लावतील, अशी अपेक्षा आहे. थलायव्हाजसाठी सुरजीतचा बचाव उपयुक्त ठरू शकेल. बंगाल-यूपी सामन्यात प्रदीप नरवालचा खेळ पाहायची संधी चाहत्यांना मिळेल. यंदाच्या लिलावात प्रदीपला यूपी संघाने स्थान दिले आहे. याशिवाय श्रीकांत जाधव, सुरेंद्र गिल यांच्यासारखे खेळाडू यूपीकडे आहेत. बंगालची मदार इराणचे बचावपटू मोहम्मद इस्माईल नबीबक्ष आणि अबोझार मोहाजीर मिघानी यांच्यावर आहे.

सामने

’  यू मुंबा वि. बेंगळूरु बुल्स

वेळ : सायं. ७.३० वा.

’  तेलुगू टायटन्स वि. तमिळ थलायव्हाज

वेळ : रात्री ८.३० वा.

’  बंगाल वॉरियर्स वि. यूपी योद्धा

वेळ : रात्री ९.३० वा.

२  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोट्र्स २, १ हिंदी, फर्स्ट आणि हॉटस्टार