कल्याणमध्ये मद्यधुंद कारचालकाने आठ जणांना चिरडले

कल्याण : कल्याणमधील दुर्गाडी सर्कलजवळ गुरुवारी एका मद्यधुंद कार चालकाने 7 ते 8 जणांवर गाडी नेत पोलीस चौकीलाही धडक दिली. या घटनेत सात ते आठ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी तैनात असलेल्या धीरज सोनवणे नावाच्या ट्रॅफिक वॉर्डनने सांगितले की, टाटा हेक्सा वाहनाचा चालक सागर जोहरे हा मद्यधुंद अवस्थेत होता. तो भिवंडीहून कल्याणच्या दिशेने येत होता. दुर्गाडी सर्कल येथे त्यांनी सात ते आठ जणांना चिरडून गाडी थेट पोलिस चौकीत नेली. यानंतर ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या बाजारपेठ पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.