नवी मुंबईतील पाणी कपातीचा निर्णय रद्द
नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरण ७४ टक्के भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटल्याने शहरात सुरू असलेली विभागवार तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय मनपा आयुक्तांनी मागे घेतला आहे.
या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरणातील पाणीसाठा कमी होत चालला होता. धरणात २६ टक्के म्हणजे ५४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळ शहरात जून महिन्यापासून विभागवार तीन दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला आहे. गुरुवारी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडून उच्चांकी अशी २८५ मी.मी. पावसाची नोंद झाली असून धरण ७४टक्के भरले आहे. धरण १००टक्के भरण्यास ८८ मीटर पातळी गाठावी लागत असून सद्य स्थितीत पाण्याने ८२.६० मीटर पातळी गाठली आहे. मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात तयार झाला आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस पडला तर या वर्षीही धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता जून महिन्यापासून शहरात सुरू असलेली विभागवार तीन दिवस पाणी कपातीचा निर्णय मनपा आयुक्तांनी मागे घेतला आहे.