ठाणे काँग्रेसचे आठ जण पक्षातून निलंबित

निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

ठाणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी आठ जणांना पुढील आदेश येईपर्यंत पक्षातून निलंबित केल्याचे कळविले आहे.

सुरेश पाटील-खेडे उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेल यांनी काँग्रेस पक्षाचा आदेश न पाळता विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याबद्दल वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांनाही पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

ब्रिजेश चौरसिया (वॉर्ड अध्यक्ष), जयप्रकाश वेद (वॉर्ड अध्यक्ष), संतोष जोशी (ब्लॉक अध्यक्ष), गुलाबसिंग यादव (उपाध्यक्ष, उत्तर भारतीय सेल), मंजूर खत्री (प्रमुख, सोशल मिडिया) आणि गिरीष कोळी (सरचिटणीस, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस) यांनी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार मनोज शिंदे यांच्या निवडणूक प्रचार कार्यात सहभागी होऊन पक्षशिस्त भंग केली तर रेखा मिरजकर या बंडखोर उमेदवार सुरेश पाटील-खेडे यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही अशाप्रकारे कारवाई करण्यात येत असल्याचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.