ठामपाच्या दोन शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

Thanevaibhav Online
14 September 2023

रोटरी क्लब ऑफ सेंट्रल आणि हुतामाकी इंडिया कंपनीचा संयुक्त उपक्रम

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलने हुतामाकी इंडिया लिमिटेड कंपनीच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली.

विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण, स्टेशनरी किट, भूमिती बॉक्स, आलेख पुस्तके, सॉफ्ट बोर्डसह व्यावसायिक आरओ वॉटर फिल्टर देण्यात आला. तसेच पाण्याची टाकी बसविण्याचे काम टीएमसी शाळा क्र. २५ पातलीपाडा आणि टीएमसी शाळा क्र.६६ वाघबिळ गाव येथील शाळांमध्ये केले. या कार्यक्रमात रोटरी प्रांताचे पदाधिकारी नितीन धुरू आणि हुतामाकी कंपनीचे अधिकारी प्रवीण देसाई, सुनीता शिलवंत, स्नेहा फळे आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल ई- लर्निंग किटचेही वाटप करण्यात आले. दोन्ही शाळांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. रोटरी क्लब ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा पियाली आलेगावकर यांनी हुतामाकी इंडिया लिमिटेडने केलेल्या अर्थपूर्ण योगदानाबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि अशीच साथ नेहमी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. रोटरी सभासद नेहा निंबाळकर, माधवी डोळे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. क्लबच्या चिटणीस स्वाती निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.