आघाडी सरकार चालवण्याचा नरेंद्र मोदी यांना अनुभव नसल्यामुळे ते नव्या सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या घटक पक्षांशी कसे जुळवून घेतील याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असले तरी भाजपाकडे संपूर्ण बहुमत असल्यामुळे घटक पक्षांचे ऐकले नाही तरी चालत असे. नव्या सरकारमध्ये तशी परिस्थिती नसेल. भाजपा नेतृत्वाला अर्थातच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यास सज्ज झालेल्या मोदींना थोडे मवाळ आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे लागेल. त्यांच्याबाबत असलेला विपक्षांचा आक्षेप की ते एककल्ली आणि प्रसंगी गरजेपेक्षा ताठर असल्याचे बोलले जात असताना ते दूर करण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने त्यांचे रालोआ घटक पक्षांसमोर झालेले भाषण बोलके होते. सत्ता स्थापन करण्यात अडचण नसली तरी निवडणूक निकालाने एकुणातच भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांना मूळ स्वभावाला मुरड घालण्याचा मोठा धडा दिला आहे यात वाद नाही.
देश चालवण्यासाठी यापुढे आघाडी-युतीचाच मार्ग स्वीकारावा लागणार हे पूर्वीच ठरुन गेले होते. त्या समजाला छेद गेला तो २०१४ मध्ये सत्तांतर झाले तेव्हा. २०१९ मध्ये भाजपाचे बळ आणखी वाढले आणि या निवडणुकीत ४०० पारचा नारा देऊन युती-आघाडी रचना कालबाह्य होणार काय असा प्रश्न निर्माण झाला. तसे झालेही असते, परंतु भाजपा नेत्यांची आक्रमक भाषणे, त्यातून ध्रुवीकरणाची प्रक्रिया, जात आणि धर्म यांना आलेले अवास्तव महत्व यामुळे २०१९ मध्ये विकासाचा मुद्दा अग्रभागी ठेऊन मतपेढ्या निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली नाही. भाजपाची ही सर्वात मोठी चूक होती. व्युहरचनेतील या दोषास केंद्रीय नेत्यांचा अहंकार करणीभूत होता असे बोलले जाऊ लागले आणि सत्तारुढ पक्ष विपक्षाने टाकलेल्या जाळ्यात अडकत गेले. संविधान धोक्यात येणार या विपक्षांनी लावून धरलेल्या मुद्याचे शेवटपर्यंत म्हणावे तेवढे खंडण झाले नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही.
निवडणुकीच्या गर्तेत हरवलेला ‘विकास’ मोदींच्या भाषणात अखेर सापडला हे बरे झाले. विकासाच्या मुद्यावर निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाची जादू यंदा हरवली होती. विकासामुळे आत्मविश्वास येतो आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांतून अहंकार अधिक धारदार होतो. निवडणुकीच्या रणधुमाळीत याचा प्रत्यय वारंवार येऊ लागला होता. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संघाबाबत केलेले विधान हे त्याचे एक उदाहरण.
निवडणुका संपल्यावर सुचलेले शहाणपण रालोआ आणि भाजपाला तारेल, परंतु मोदी जे बोलले ते सर्वकाही आचरणात आले तरच. केवळ घटक पक्षांचेच नव्या सरकारला ऐकावे लागणार आहे असे नव्हे तर विपक्षांची ताकदही त्यांना नजरेआड करुन चालणार नाही. आघाडी-युती अपरिहार्य असणार आहे आणि त्यामुळे नवे सरकार त्यांच्याशी निगडीत धर्माचे पालन करील हीच अपेक्षा! सबका साथ, सबका विकास ही केवळ घोषणा रहाणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागणार !