बोथट तलवारी, निर्बुद्ध नेते ! 

भारतीय समाज इतिहासात रमणे पसंत करीत असतो. त्यामुळे इतिहासातील प्रतीके त्याला आकर्षित करीत असतात. उदाहरणार्थ आपल्या पूर्वजांनी ज्या तलवारीच्या मदतीने शौर्य दाखवले ती तलवार नेत्यांना खूप भावात असते. निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याला चांदीची तलवार भेट देऊन ती हवेत मिरवण्यात सांगण्यात येत असते. प्रातिनिधिक स्वरूपात तलवारीच्या मदतीने शत्रूचा नायनाट होईल असा संदेश विरोधकांना दिला जात असतो. जिथे दांभिकपणा हा राजकारणाचा गुणधर्म बनला आहे तिथे अशा पोकळ धमक्या देण्याचे मार्ग राजकारण्यांनी शोधले नाही तरच नवल. 
 
मुंबईत एका कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तलवारी उंचावून शक्तिप्रदर्शन केले. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी भाजपाच्या तक्रारींची अशी दखल घेतली म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तलवार उंचावत असल्याचा फोटो ट्विट केला. कायदा सर्वांना समान असावा अशी त्यांची मागणी आहे. 
 
भाजपा आणि महाविकास आघाडी नेत्यांत सध्या दररोज जो कलगीतुरा रंगत आहे. त्यातून हे तलवार प्रकरण उपजले आहे. तलवारीचे प्रदर्शन हा दखलपात्र गुन्हा असेल तर मग गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे आणि त्यात बड्या नेत्यांच्या हाती तलवारी दिसतील. म्हणजे मग आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण कापूसकोंड्याच्या गोष्टीप्रमाणे अखंडपणे सुरु राहील. गोष्टीतला बालिशपणा निरागस असतो. पण तलवारीच्या गोष्टीतील नेत्यांचे वागणे हास्यास्पद ठरते. 
 
मुळात नेत्यांना अशा तलवारी मिरवण्याची गरजच काय? त्यांच्या मनगटात चांगले काम करून दाखवण्याची धमक राहिली नाही की चांगल्या कामापेक्षा पाशवी बळाचा वापर करूनच मतदारांना अंकित करता येते हा दृढ समज त्यामागे आहे? जिथे बुद्धी तोकडी पडते तिथे शक्तीचा आसरा घेतला जातो. तलवार दाखवून नेतेमंडळी बौद्धिक ऱ्हास होत असल्याचा पुरावा देत आहेत. तलवारीपेक्षा विचारांना धार हवी आणि मनगटातील जोर हा कोणाला धमकावण्यासाठी वापरण्याऐवजी समाजहिताचे काम करण्यासाठी वापरण्याचा विचार राजकारणातून तडीपार झाला. त्या दिवसापासून नंग्या तलवारी घेऊन नेते आपले बौद्धिक विवस्रपण दाखवू लागले. हे केवळ संतापजनक नाही तर किळसवाणे होत चालले आहे. आरोप-प्रत्यारोप करून ‘हमाम में सारे नंगे’ या युक्तीची आठवण नेते विसरलेले दिसतात. ज्या शिवरायांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य मिळवून दिले त्या तलवारीचे पावित्र्य नेतेमंडळी घालवत आहेत.