शिवसेना पदाधिकारी मिलिन्द रघुनाथ मोरे यांचा आकस्मिक मृत्यू ज्या परिस्थितीत झाला ती लक्षात घेता महाराष्ट्राचे समाजजीवन किती विस्कळित आणि आक्रस्ताळी झाले आहे याचा प्रत्यय येतो. वर्तमानपत्र कार्यालयात आणि वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे माध्यमवीर काय दाखवतात हे समजून घेण्यासाठी प्रक्षेपण सुरु असते. तो त्यांच्या कामाचा भाग असतो. परंतु अनेक घरांमध्ये वाहिन्यांवरून प्रसारित होणार्या बातम्या येऊन धडकतात तेव्हा प्रेक्षकांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केला जातो काय, हा प्रश्न आहे. दुकानात शिरुन सशस्त्र चोरांचा हैदोस, वाहतूक कोंडी किंवा अपघात होतो तेव्हा तेथे होणारी हिंसा, महिलांच्या डब्यात झिंजा उपटण्याचे प्रकार, कोणी गाड्या फोडतोय, कोणी कोणाचा रस्त्यात खून पाडतोय. भरधाव वाहने पादचाऱ्यांना काय उडवत आहेत, कोणी आत्महत्या करीत आहे तर कोणी आत्मदहन करताना दिसत असतो. मंत्रालयातील वरच्या मजल्यावरुन उड्या काय मारल्या जात आहेत आणि नेतेमंडळी तर सर्व निर्बंध झुगारून एकमेकांना क्षणक्षणाला आव्हान देताना दिसतात. या सर्व घटनांमुळे समाज-स्वास्थ्य हरवले आहे.
आपल्या कुटुंबियांसमवेत सहलीस गेलेल्या मिलिन्द मोरे यांना किरकोळ कारणातून मारहाण झाली. किरकोळ हा शब्द सापेक्ष मानला तरी त्यातून जी प्रतिक्रिया उमटली आणि कोणाच्या तरी जीवावर बेतली ही बाब समर्थनीय ठरत नाही. समाजात होऊ घातलेले प्रतिकुल बदल त्यास कारणीभूत आहेत. संयम, सहिष्णुता आणि सामोपचार ही मूल्ये समाज जवळजवळ विसरत चालला आहे आणि त्याचे प्रत्यंतर अशा जीवघेण्या विस्फोटक स्थितीत रुपांतरित होत आहे. मिलिन्द मोरे हे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या निधनाचे दु:ख शिवसैनिकांना होणे स्वाभाविक आहे. या कुटुंबाचे आयुष्य रघुनाथ मोरे यांच्या काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर विस्कटले होते. मिलिन्द मोरे यांनी ते सावरण्याचा प्रयत्न केला होता आणि काळाने हा दुर्दैवी आघात केला. त्यामुळे ठाणेकारांना हळहळ वाटत आहे. मोरे यांचा मृत्यू रविवारी झाला. सोमवारी विरार परिसरातील रिसोर्ट, जिथे मोरे यांना मारहाण झाली होती. ते पाडण्यात आले. अनधिकृत बांधकामावर महापालिकेतर्फे जी कारवाई होती तशी ती झाली असे सांगण्यात आले. त्यामुळे मोरे यांचा मृत्यू आणि ही कारवाई असा संबंध जोडला जात असला तरी प्रशासन त्याकडे दोन स्वतंत्र घटना म्हणून पहात आहे. त्यावर येत्या काही दिवसांत उलटसुलट चर्चा होत राहणार. आमच्या मते अशा राजकीय गदारोळात समाजमनावर जे विपरीत परिणाम होऊ लागले आहेत आणि हिंसाचाराला पुरक वातावरण तयार होत आहे, त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.