मुख्यमंत्री फरार ? काळजी असावी !

परिस्थिती किती हाताबाहेर चालली आहे, हे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाचा ससेमिरा टाळण्यासाठी चक्क फरार व्हावे लागले, यावरुन स्पष्ट होते. पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून चोर फरार झाल्याच्या बातम्या आपण वाचत आलो आहोत. पण झारखंडमुळे राजकीय नेते हे चोरांच्या मांदियाळीत जाऊन बसले आहेत काय, असा प्रश्न पडतो. अत्यंत लाजिरवाणी अशी ही बाब आहे आणि राजकारणाकडे पाहण्याचा आम जनतेचा दृष्टीकोन त्यामुळे कलुषित होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सक्तवसुली विभाग असो की केंद्रीय गुप्तचर विभाग, ही खाती विरोधी पक्षांना नामोहरम करण्याचेच काम करीत असल्याची टीका सुरु आहे. विपक्षांना काबुत ठेवण्यासाठी या दोन खात्यांचे बळ वापरले जाते आणि विपक्षांना बदनाम करण्याचा एक मोठा कट आहे, अशी चर्चाही सुरु आहे. सरकार आहे म्हणून ते काहीही करु शकते हा युक्तीवाद मान्य करण्यासारख्या घटना घडत असतात. ती सर्वपक्षीय बाब आहे. त्यामुळे आज जे कांगावा करीत आहेत, त्यांनी इतिहासात डोकावले तर त्यांना आपला दांभिकपणा लक्षात येईल. जनतेच्या मनात अशावेळी एकच प्रश्न येतो आणि तो म्हणजे जर एखाद्या नेत्याला गोवले जात असल्याचे वाटत असेल तर त्याने धीटपणे चौकशीला सामोरे जाण्यात कोणती अडचण असते? श्री. सोरेन यांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. ते ईडीच्या कार्यालयात जातही होते. मग अचानक त्यांनी हा पवित्रा का घेतला, हा खरा प्रश्न आहे.
मुख्यमंत्रिपदी विराजमान व्यक्तीकडे समाज वेगळ्या नजरेने पहात असते. राज्याचा प्रमुख म्हणून सर्व बऱ्या-वाईट गोष्टींना तोच जबाबदार असतो. त्याच्या वर्तनावरुन राज्याची प्रतिमा ठरत असते, प्रशासनाचा दर्जा ठरत असतो. परंतु श्री. सोरेन जर खरोखरीच ईडीच्या ‘रडार’ वरुन नाहीसे झाले असतील तर त्यांच्या प्रतिमेला तडे जाऊ शकतात. असे नेतृत्व असेल तर भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांना ऊत येऊ शकतो. भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी निवडुन आलेले लोकप्रतिनिधी गैरव्यवहार करु लागले तर आदर्श म्हणून जनतेने आणि अधिकाऱ्यांनी कोणाकडे पहावे?
सोरेन यांनी ते फरार झाले नसल्याचा खुलासा केला आहे. ते चौकशीला सामोरे जाण्यासही तयार आहेत. तसे झाले तर त्यांची नाहक बदनामी करणाऱ्यांची नाचक्की होऊ शकते. परंतु तसे झाले नाही तर देशातील जनतेच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. आगामी निवडणुकीत भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांकडे सहानुभूतीने पहाण्याची चूक मतदारांनी करता कामा नये. मुख्यमंत्रीच फरार होत असेल तर राजकारणाकडे अधिक गांभीर्याने पहायची वेळ आली आहे, अशी खुणगाठ आताच बांधायला हवी.