वाचा आणि शिका

राहुल गांधी वर्तमानपत्रे वाचत असतील तर या दोन बातम्यांची ते गांभीर्याने दखल घेतील. पहिल्या बातमीत निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या एका निरीक्षणाची नोंद आहे. काय म्हणाले प्रशांत किशोर? भाजपा हा अजून काही वर्षे देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार. त्यामुळे काँग्रसने नरेंद्र मोदी यांच्या पदच्युत करण्याचे स्वप्न पाहण्याचा अततायीपणा करता कामा नये, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला आहे.

दुसरी बातमीही काँग्रेसचा दोष दाखवणारी आहे. तृण्मुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष हा ट्विटरपुरता मर्यादित राहिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याची दखलही काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. शतकाहून जास्त काळ देशाच्या सार्वजनिक क्षितीजावर सक्रीय असणार्‍या आणि देशाला ज्या पक्षाने ललामभूत ठरलेले एकाहून एक दिग्गज नेते दिले, त्यांच्यावर अशी टिप्पणी करणारे प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी कोण? असा प्रश्न विचारून काँग्रेसचे नेते ही टीका गालिच्याखाली लोटून देतील. विशेष म्हणजे हाच सूर पक्षनेतृत्त्वाच्या गुणवत्तेबद्दल शंका उपस्थित करणार्‍या ‘जी-२३’ नेत्यांनी लावला होता. परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चमच्यांनी याच नेत्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात बसवले. अशा वेळी प्रशांत किशोर-ममता किस झाडकी पत्ती? पण इथेच ते चूक करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे ‘मोदी-हटाव’ स्वप्न कागदावरच राहू शकते.

ज्या पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतात त्यांना हटवणे सोपे नसते, असे प्रशांत किशोर यांचे शास्त्रोक्त म्हणणे आहे. काँग्रेसच्या बाबतीत वर्षानुवर्षे असे झाले होते. त्यामुळे तरी राहुल-सोनिया यांनी प्रशांत किशोर हे काही विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन टीका करीत आहेत, असे मानायची गरज नाही. तसा दृष्टीकोन असेल तर याच प्रशांत किशोर यांना काँग्रेसने निवडणुकीची व्युहरचना आखण्याची जबाबदारी का दिली होती? उत्तर प्रदेशात पक्षाला पराभवास सामोरे जावे लागल्यावर त्यांनी प्रशांत किशोर यांची सेवा खंडीत केली होती. या रागातून किशोर बोलत नसतील असेही नाही. परंतु ममतांचे काय? त्यांनी भाजपाला धूळ चारून किशोर यांचे म्हणणे खोडून काढले होतेच की. किशोर हे तृणमूल चे व्युहरचनाकार होते.त्यांचे म्हणणे तरी काँग्रेस गांभाीर्याने घेणार आहे की नाही?

राहुल यांच्याकडे अध्यक्ष म्हणून पाहण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नाही. त्यामुळे त्यांनी ममता यांनी केलेली निवडणुकीतील मेहनत (ज्याबद्दल कोणाचे दुमत नसावे) करायला सुरूवात करावी ट्विटरसारख्या आभासी दुनियेतून त्यांनी वास्तवात प्रवेश केला तर २०२४ नाही, पण २०२९ पर्यंत पक्षाकडे देशाची सूत्रे येतीलही, कदाचित!