रस्त्यावर रक्त का सांडते ?

अरुंद रस्ते, बेशिस्त वाहनचालक, वाहन हाकणाऱ्याला नसलेले सामाजिक भान आणि अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेचा हताशपणा यामुळे बहुतांशी शहरांत दररोज लहान-मोठे तंटे होत असताना दिसणे जणू नित्याचेच झाले आहे. काही वेळा ही शाब्दिक भांडणे हिंसक वाळण घेताना दिसतात आणि त्याचे प्रत्यंतर खुनात झालेले आपण पहात आलो आहोत. असाच एक प्रकार मुंबईत सोमवारी घडला आणि किरकोळ वाटणाऱ्या भांडणात एकाच जीव गेला. पुन्हा एकदा अरुंद रस्ते आणि वरील काही बाबी चव्हाट्यावर आल्या. अर्थात शासनाकडे कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणारच नाहीत असे छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नाही. ताज्या घटनेत बाली गेलेल्या तरुणाचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यावरून या कुटुंबावर केवढे मोठे संकट कोसळले आहे याचा अंदाज यावा. जीवघेणा हल्ला करणारा तरुण आपत्तीस जितका जबाबदार आहे तितकीच आपली यंत्रणा हे कबूल करावे लागेल. 
 
वाहनचालकांचा संयम संपला आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ राहिलेले नाही. सिग्नल यंत्रणा बंद असते. रस्त्यांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष आहे. धूळ खात पडलेल्या गाड्या रस्ता महिनोन्महिने व्यापून आहेत. पार्किंगचे धोरण नसल्यामुळे रस्ते अडवले जात आहेत. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत कूच करावी लागत असते. त्यात एखादा बेफाम आणि अतरंगी वाहनचालक असेल तर शब्दांचा आसरा घेण्याऐवजी तो शस्त्र हाती घेऊ लागला आहे. त्यातून एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे पण त्याचे सोयरसुतक आपल्या प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. जनतेला अशा पाशवी शक्तीसमोर स्वतःचेच रक्षण करण्याची नामुष्की येत असेल तर या शहरांना सुसंस्कृत तरी कसे म्हणता येईल? कोणी यावे आणि चाकू भोसकून खून करावा याला मोगलाई म्हणायची की जंगलराज? या गंभीर प्रकाराबद्दल संबंधित सरकारी खात्यांना जाब विचारायला हवा. गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनचालक आणि बेदरकार रिक्षाचालक यांच्यात जणू कोण अधिक वाह्यात यावरून स्पर्धा लागली आहे. रिक्षाचालकांना गाडीचा ब्रेक कधी मारायचा असतो याचे प्रशिक्षणच दिलेले नसते. त्यांना अशी काही मरणाची घाई असते की विचारू नका. शिस्तही मोडायची आणि वर अरेरावी करायची हि सवय व्हॅनचालकांत इतकी रुजली आहे की तो जणू नवीन वाहन संस्कृतीचा (?) भाग झाला असावा. शेअर-रिक्षा वाहनचालकांचे वर्तन तर काळजीचा विषय बनत चालले आहे. नाही म्हणायला जो बलवान तोच जगू शकेल हा चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीबाबतचा सिद्धांत आधुनिक युगात वाहनचालक खरा ठरवू लागले आहेत. उत्क्रांतीचे चक्र उलटे फिरत असल्याची कोणालाच चिंता नाही याचा खेद वाटतो.