कोणीही व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होत असेल तर त्यामागे व्यक्तीगत कारण जितके असते तितकेच भवतालची परिस्थिती जी हे टोकाचे पाऊल उलचण्यास कारणीभूत ठरत असते. 2017 ते 2021 या चार वर्षांत देशातील 14 ते 18 वयोगटातील तब्बल 24,568 मुलांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदी ब्यूरोने जाहीर केले आहे. ही बाब नक्कीच धक्कादायक आहे. खास करुन ज्या वयोगटाला जीवनाचे मोल आणि मृत्यूची भीषणता यांचे आकलनही नसते अशा वयात. सज्ञानही न झालेली मुले आत्महत्या करीत असल्यामुळे समाजातील अधोगती आणि कुटुंब नामक संस्थेच्या उपयुक्ततेबाबत शंका उपस्थित होऊ शकते.
या आत्महत्यांची वर्गवारी एनसीआरबीने केली आहे. सर्वाधिक आत्महत्या या परीक्षेतील अपयशामुळे (4046), फसलेली प्रेमप्रकरणे (3315), आजारपण(2567), शारीरिक छळ (41) आणि लग्नासंबंधी कारणे (639) अशी आहे. देशाच्या तरुणाईबाबत चिंता वाटावी असे हे चित्र आहे. देशाचे भवितव्य म्हणुन ज्यांच्याकडे आपण आशेने पहातो, त्यांचा वर्तमान इतका निराशाजनक आणि अंधकारमय असेल तर आपल्या समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आदी सर्वच कसोट्यांवर तपासणी करावी लागेल. शिक्षण क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, कधी पालकांचा दबाव तर कधी विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासक्रमाची चुकीची निवड, यामुळे होणारा अपेक्षाभंग, परीक्षा पध्दतीमधील त्रुटी, गुणांकातील सावळा गोंधळ, धोरणात वारंवार होणारे बदल यांमुळे शिक्षण क्षेत्र दिलासा देण्याऐवजी अस्थिरतेचे निखारे पदरात घालत असते. मुलांचा विश्वास वाढण्याऐवजी त्यास तडा देण्याचे काम शिक्षणपध्दतीमुळे होत असेल, असाच निष्कर्ष या आत्महत्या पाहून काढावा लागेल.
प्रेमप्रकरणे असोत की लग्नाबाबतचे तंटे, याच्याशी शिक्षणाचा संबंध जोडला जाऊ शकतो. या दोन्ही गोष्टींना सामोरे जाण्यासाठी लागणारी परिपक्वता शिक्षणामुळे येणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर कुटुंबाला हात झटकून मोकळे होता येणार नाही. बहुसंख्य घरात संवादाचा अभाव आणि त्यातून मुलांचा एकलकोंडीपणा आणि चुकीचा विचार करण्याची प्रवृत्ती यांमुळे विचित्र मानसिकतेचे ही मुले शिकार होत आहेत. ज्या वयात मुले भरकटतात त्या वयात सावरण्याचे पर्यावरण आपण निर्माण करु शकलो नाही. या आत्महत्या अन्यथा रोखता येऊ शकतील.
आत्महत्या करणार्याबाबत सहानभूती क्वचितच असते. परंतु म्हणुन त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी समाजाची असते. आत्महत्या सामुहिक अपयशाची उत्पत्ती आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.