उल्हासनगरमधील भाजपाच्या आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने कोणत्या पक्षाला त्याचा फायदा वा तोटा झाला एवढा सीमित अर्थ काढणे चुकीचे होईल. वरकरणी राष्ट्रवादीचा फायदा आणि भाजपाचा तोटा झाला असे अनुमान निघू शकते. परंतु प्रत्यक्षात ज्या नगरसेवकांनी पक्षांतर केले ते भाजपाचे अल्पकालीन समर्थक होते. त्यांना पक्षाशी काही देणेघेणे नव्हते. ही बांधिलकी खूर्चीपुरती होती. एरवी पक्ष नगरसेवकांना वापरून फेकून देत असतात. पण इथे तर भाजपाला वापरून फेकून देण्यात आले आहे. त्याअर्थी भाजपाचे नुकसान नक्कीच अधिक आहे. राष्ट्रवादीने परिस्थितीचा अचुक फायदा उचलला आणि भाजपाच्या सोयीचे म्हणा की बेरजेचे राजकारण किती पोकळ असते हे दाखवून दिले. राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादी चलाख निघाली हे मात्र खरे!
भाजपाकडे 2014 साली पहाण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. पार्टी विथ डिफरन्स असे स्वत: भोवती वलय निर्माण करून फुशारकी मारणारा भाजपा सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ लागला. अन्य पक्षांसारखेच ते वागू लागले. कलानी कुटुंब भाजपाचे कधीच नव्हते. परंतु शिवसेनेला धडा शिकवण्याच्या घाईत त्यांनी सोयरीक केली. आता फजिती कोणाची झाली?
राजकारणात अस्तिव टिकवायचे तडजोड होत असते किंवा तोडफोड. या दोन्ही बाबी नैतिकतेला धरून होत नसतात. भाजपाने याच कारणास्तव तर अनेकदा विरोधी पक्षात रहाणे पसंत केल्याचा उज्ज्वल इतिहास आहे. परंतु कालांतराने त्यांच्या तोंडाला सत्तेची चटक लागली आणि विरोधी पक्षात बसणे त्यांना मानवेनासे होऊ लागले. सत्तेसाठी काहीही करणार्या भाजपाला पहाटेचा तो वादग्रस्त शपथविधी कसा महाग पडला होता हे आपण जाणतोच. तसाच प्रकार उल्हासनगरमध्ये थोड्याफार फरकाने झाला आहे. या पक्षांतरामुळे पक्षाचे जुने-जाणते आणि निष्ठावंत कार्यकर्ते मनोमन सुखावले असतील. पक्षाला त्यांची किंमत यानिमित्ताने कळू शकेल. भाजपाने यापुढे पक्षात कोणालाही घेताना काही पथ्ये पाळायला हवीत. काही निकष निश्चित करायला हवेत. पक्षात घेताना केवळ कोणावर गंगाजळ शिंपडून, मनगटावर गंडा घालून वा खांद्यावर पक्षाचा झेंडा ठेऊन नवीन सदस्यांना प्रवेश देणे चुकीचे ठरते. त्या झेंड्याबरोबर पक्षाचे तत्वज्ञान, ध्येयधोरण, संस्कृती, विचारसरणी आदी बाबीही प्रयत्नपूर्वक रुजवायला हव्यात. क्षणिक आनंदासाठी भाजपाने आपल्या घराचे दरवाजे सताड उघडे ठेवले खरे, पण आता मात्र दारे बंद करून निष्ठावंतांना प्रोत्साहन देण्याचे शहाणपण त्यांना आले असेल असे वाटते.