लॉकडाऊनऐवजी भरवसा उठला !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जनता सावरली असली तरी सरकार मात्र सावरलेले दिसत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्याचा सावध पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. या उलट व्यापारी आणि उद्योजक लॉकडाऊन उठवण्याची मागणी करू लागले आहेत. पहिल्या लॉकडाऊनपासून सुरू असलेला हा विसंवाद वर्ष लोटले तरी सुरूच आहे. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार असे वाटते.
दुसऱ्या लाटेने भलताच हाहाःकार उडवला, यात दुमत नाही.लाट महाभयंकर होती की शासन आणि अर्थातच जनता यांनी कोरोना संपला असा गोड गैरसमज करून घेतला होता? यावर विचार होण्याची गरज आहे. जे चुकले त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, असे शासनाला वाटणे स्वाभाविक आहे. कारण अंतिम जबाबदारी त्यांचीच असणार आहे. अटी शिथील करण्याचा आग्रह धारणारे दोन्ही बाजूंनी बोलणार यात शंका नाही. पण म्हणून सरकारने अतिसावधगिरी बाळगणे कितपत उचित ठरेल.
दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढण्यामागे प्रामुख्याने सरकारी यंत्रणेत आलेली शिथिलता कारणीभूत होती. जगभरात दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना भारतात मात्र राजकारणी निवडणुकांत तर जनता कुंभमेळ्यापासून धार्मिक कार्यक्रमांत गुंतली होती. लग्नाचे मंडप पूर्वीसारखेच ओसंडून वाहताना दिसले. त्याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. अशा वेळी रुग्णालयांची सुसज्जता, प्राणवायू आणि औषधांचा साठा, आरोग्य कर्मचाऱ्याची उपलब्धता याबाबींकडे दुर्लक्ष झाले हे नाकारून चालणार नाही. या चुका दुरूस्त झाल्या तर तिसरी लाट थोपवणे कठीण जाणार नाही. हा आत्मविश्‍वास सरकारकडे अजून का येऊ नये याचे आश्‍चर्य वाटते. त्यामुळे निर्बंध शिथील करण्यात बोटचेपे धोरण घेतले जात आहे. जनतेला नेमका याच बाबींचा प्रश्‍न पडला आहे. त्यांना कोरोनापेक्षा सरकारचा राग येऊ लागला आहे. अशा मानसिकतेत निर्बंध पाळले जाणे कठीण होऊन बसते. आता दुकानदारांनी तसा इशारा दिला आहे.
तिसऱ्या लाटेबाबत किंवा म्युकरमायकोसिस या नविन रोगाबद्दल भीती वाटण्यापेक्षा त्याला कसे सामोरे जायचे यावर विचार होण्याची गरज आहे. शासनाकडून सावधगिरी आणि सकारात्मकता या दोहोंची अपेक्षा आहे. सरकारने स्वतःवर आत्मविश्‍वास असल्याचे दाखवून द्यायला हवे. ते आत्मबळ आले तर निर्बंध सैल करणे आणि प्रसंगी ते कडक करणे सोपे जाईल. तेव्हा जनताही सरकारच्या भूमिकेशी सहमत असेल. आता नेमके उलट चित्र दिसत आहे. सरकारला मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्यावर हात उगारण्याच्या मनःस्थितीत समाज आहे.
कोरोनाच्या लाटा येत-जात राहणार म्हणून कायम लॉकडाऊनमध्ये जखडून घ्यायचे की आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेऊन जनतेला जबाबदारीने वागण्याचे आवाहन करून व्यवहार खुले करायचे हे शासनाने ठरवायला हवे. हे कठीण काम आहे. आणि म्हणूनच बहुधा लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सोपा मार्ग निवडला गेलेला दिसतो. जनतेचा सरकारवरचा आणि सरकारचा जनतेवरचा भरवसा उडणे आहे ही लॉकडाऊनमागची शोकांतिका आहे.