तारेवरची कसरत

राजकारणात टिकू न राहायचे असेल तर नेत्याला तारेवरची कसरत करावीच लागते. सकाळ-संध्याकाळ समोर येणाऱ्या अडचणीच्या प्रसंगांवर मात करताना आपला तोल जाणार नाही याची खबरदारी नेत्यांना घ्यावी लागत असते. श्री. उद्धव ठाकरे यांचे मालेगाव येथील जाहीर सभेतील भाषण त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात सरकार स्थापन करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या श्री. ठाकरे यांना राहुल गांधी यांना अखेर त्यांनी के लेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील आक्षेपार्ह विधानावरून फटकरावे लागले. सरकार अस्तित्वात नसले तरी आगामी निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधी यांच्यावरील टीका त्रासदायक ठरू शकते. श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सावरकरांबद्दलच्या भावना लक्षात घेऊन ही जोखीम उचललेली दिसते. त्याचा किती राजकीय फायदा व तोटा होईल हे सांगता येणार नसले तरी प्राप्त परिस्थितीत त्यांची भूमिका त्यांची आणि पक्षाची भूमिका सुस्पष्ट करणारी आहे. श्री. उद्धव ठाकरे यांच्या सभांना होत असलेली गर्दी विद्यमान सत्तारूढ पक्षासाठी सुचिन्ह मानता येणार नाही. शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अशा सभांना मिळणारा प्रतिसाद वेगळाच संदेश देऊन जात आहे. श्री. ठाकरे हे सहजासहजी शरण जाणारे नाहीत असा इशारा या सभा देत आहेत. सत्तेत असताना काहीसा मवाळ चेहरा घेऊन फिरणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसैनिक सुखावले असणार. त्यांची ही प्रतिमा त्यांच्यासाठी गरजेची आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याकडून अपेक्षित न्याय न मिळाल्यामुळे त्यांना आक्रमकपणा दाखवण्याशिवाय गत्यंतरही नाही. जेव्हा प्रश्न अस्तित्वाचा येतो तेव्हा जीवाच्या आकांताने सैनिक निर्वाणीची झुंज देत असतो. उद्धव ठाकरे तशी झुंज देऊ पाहत आहेत. हा बदल शिंदे-फडणवीस यांना अपेक्षित नसेलही. त्यामुळे त्यांनाही आता व्यूहरचना बदलावी लागणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आजही भावनिक पातळीवर सुरू आहे. त्यात राजकारणाची मात्रा कमीच आहे. जनता या राजकारणाला कंटाळली आहे. उभय बाजूंचे कार्यकर्ते त्यात रस घेत असले तरी जनता मात्र पुढाऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्यांना विटली आहे. तेच- ते आरोप आणि ते करताना वापरली जाणारी भाषा, यापेक्षा नेतेमंडळी महाराष्ट्रहिताच्या गोष्टी बोलतील तर बरे होईल. त्यांना महाराष्ट्राची चिंता आहे की स्वतःची असा प्रश्न जनतेला पडला आह