(रड)कथा खड्ड्यांची!

रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडणे तसे नवीन नाही. त्याची चर्चा आता थेट गणपतीपर्यंत सुरू राहील. ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यापासून ते खड्डे त्यांच्याकडून बुजवून घेण्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत राहतील. एकीकडे हे सर्व सोपस्कार सुरू असताना नागरीकांना मात्र खड्ड्यातून वाट काढत आणि जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. आपण भरत असलेल्या करातून इतकी निकृष्ट कामे होतातच कशी या प्रश्‍नावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होईल. पण सात्विक संताप व्यक्त करण्यापलिकडे ते काही करू शकणार नाहीत. विरोधी पक्षांची खड्ड्यातील वृक्षरोपणे किंवा मासे पकडण्याची ‘अभिनव’ आंदोलने पाहून त्यांना हसावे की रडावे हे समजणार नाहीत. थोडक्यात खड्ड्यांची ही कथा वर्षानुवर्षे सुरू आहे आणि त्यात कितीही अधिकारी बदलले वा सत्ताधिश बदलले तरी फारसा फरक पडलेला दिसत नाही. चेंज इज कॉंस्टंट या उक्तीप्रमाणे खड्डेही कॉंस्टंट असतात.
यंदा मात्र खड्ड्यांची समस्या अधिकच गंभीर होणार आहे. त्याचा अंदाज ठाणे महापालिकेला आला असावा. आयुक्तांनी ठेकेदारांना खड्डे बुजवण्याचे रीतसर आवाहन करूनही त्याबाबतीत हालचाल झाली नाही. याचे कारण ठेकेदारांना रस्ते तयार केल्याची देयकेच मिळालेली नसल्याने  ते खड्डे बुजवण्यासाठी पैसा कोठून आणणार? ठेकेदारांनी हात वर केले तर खड्डे तसेच राहणार, उलट वाढत जाणार.
कोरोनानिवारणासाठी महापालिकांना फार मोठ्या प्रमाणात निधीचे पुनर्विनियोजन करावे लागले आहे. नवीन रुग्णालये उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च आला. रुग्णांच्या जेवणाची सोय, औषधखरेदी, यंत्रसमुग्रींचा बंदोबस्त, डॉक्टर आणि आणीबाणीत नेमलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पगार आदींना प्राधान्य द्यावे लागले. सहाजिकच महापालिकेची देणी थकली. त्याबाबत ठेकेदारामंडळींचा तगादा लावला आहे. यामुळे त्यांच्याकडून खड्डे बुजवण्याची किती अपेक्षा ठेवता येईल हा प्रश्‍नच आहे.
मग अशा वेळी महापालिका खड्ड्यांचा कसा बंदोबस्त करणार हा खरा प्रश्‍न आहे. यावर तुर्तास तरी एकच उपाय दिसतो. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गदर्शनाखाली हे काम करून घेता येऊ शकेल. त्यासाठी येणारा खर्च यथावकाश ठेकेदाराच्या देय रकमेतून कापून घेण्याची तरतुद ठेवावी लागेल. तसे झाले तरच नागरीकांना आणि आपल्या लाडक्या बाप्पाला खड्डेविरहित रस्त्यांवरून चालणे शक्य होईल. कोरोनामुळे रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, ठेक्यांतील कथित भ्रष्टाचार, खालावलेला दर्जा, बेसुमार खोदाई अशी दुष्ट साखळी तुटेल ही किमान आशा आहे.