पंतप्रधानपदी सलग सात वर्षे राहण्याचा मान यापूर्वी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी आणि डॉ.मनमोहन सिंग यांना मिळाला होता. देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे हा पल्ला गाठणे तसे पंतप्रधानांना सोपे नसते आणि म्हणुनच नरेंद्र मोदी यांची हा टप्पा पार केल्याबद्दल दखल घेतली जात आहे. त्यांचे अनुयायी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत असताना त्यांचे टीकाकार मात्र सात वर्षातील चुकांना उजाळा देत आहेत. ते काही असले तरी श्री. मोदी यांना आजही जनतेची सहानुभूती आहे आणि त्यांच्यातील कथित मर्यादांवर ते या प्रतिमेच्या बळावर मात करीत आहेत. सात वर्षांत श्री. मोदी यांच्यावर कोणत्याही प्रकारचे लांच्छन आले नाही. त्यांच्या अनेक निर्णयांवर टीका जरूर झाली. मग तो निश्चलीकरणाचा विषय असो की काश्मिरमध्ये ३७० बाबत घेतलेला धाडसी निर्णय असो. शेतकी विधेयकावरून मोदी सरकाविरूद्ध आजही आंदोलन सुरू आहे आणि लस व्यवस्थापनातील त्रुटींचे खापर त्यांच्यावर फोडले जात आहे. असे असूनही त्यांच्या लोकप्रियतेत लक्षणीय घट झालेली नाही. त्यमुळे २०२४ साली होणार्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा बाजी मारली तर आश्चर्य वाटू नये.
श्री. मोदी यांच्या नेतृत्वावर, अगदी ते हेकेखोर असल्याचा आरोप होत असताना,तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब कसा होऊ शकेल, या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागेल. डॉ. मनमोहन सिंग यांना हॅट्रिक साधता आली नव्हती. तसे पाहिला गेले तर मोदी यांच्याप्रमाणे डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमाही स्वच्छ होती. ती मलीन झाली असेल सहकारी मंत्र्यांमुळे. सिंग यांच्याबद्दल आजही आदराने बोलले जाते. श्री. मोदी यांना जनतेने यदाकदाचित नाकारले तर त्यास राज्यकारभार चालविण्यातील उणिव कारणीभूत असेल. युपीए सरकारला भ्रष्टाचाराने वेढले होते. एनडीए सरकारला ‘गूड गव्हर्नन्स’ वरून अपाय होऊ शकतो. भ्रष्टाचार हा विषय एखादवेळी मोदी सरकारच्या अपयशास कारणीभूत ठरणार नाही. काही प्रमाणात भ्रष्टाचार स्वीकारणारी जनता कार्यक्षमतेच्या कसोटीवर अपेक्षांना न उतरणाऱ्या सरकारला शिक्षा देऊ शकते. श्री. मोदी यांना मंत्रीमंडळातील सदस्यांना जनतेच्या अपेक्षांना उतरण्याजोगे वातावरण तयार करावे लागेल. त्यासाठी त्यांना मूळ स्वभावात बदल करावा लागेल. सांघिक प्रयत्नांचा आविष्कार मोदी सरकारमध्ये दिसत नसल्याची विरोधकांची आणि विश्लेषकांची ओरड अगदीच गैरलागू आहे, असे मानता येणार नाही. मोदींना सर्वसमावेशकतेवर भर द्यावा लागेल. विरोधकांना मोदींच्या त्रुटींचा फायदा उठवून पुढील मार्गावर चालता येऊ शकेल. पण त्यासाठी निर्विवाद आणि निर्णायक नेतृत्व लागेल. तेच त्यांच्यापाशी नाही. मोदींची सात वर्षांच्या पूर्ततेचा क्षण त्यांच्यासाठी आणि विरोधकांसाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे.