अलिकडे मराठी शाळांत पाल्याला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढल्याची सुखद बातमी वाचनात आली. मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करणार्यांना त्यामुळे भरून आले असेल. मराठी भाषा इंग्रजी मावशीपुढे नांगी टाकते की काय अशी चिंता वाटणार्यांना तर विशेष आनंद झाला असेल. आणि का होऊ नये? आपल्या मातृभाषेवर प्रेम असण्यात काहीच गैर नाही. परंतु इंग्रजी शाळांचे शुल्क परवडत नाही किंवा या भाषेबद्दल आकस आहे म्हणुन मराठी शाळेत प्रवेश घेणे चुकीचे ठरेल. मराठीचा तो एकप्रकारे अवमान आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेण्यात कमीपणा नाही. उलट त्यामुळे ज्ञानार्जन अधिक प्रभावी होते आणि आत्मविश्वास वाढतो. हा विचार मराठी माध्यमाची निवड करण्यामागे असेल तर त्याचे निश्चितच स्वागत करायला हवे.
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने गोदावरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ख्यातनाम दिग्दर्शिका सई परांजपे यांनाही पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात त्यांनी मांडलेले विचार आणि मराठी भाषेचा आग्रह धरणारे यांच्यातील केलेले एक सुक्ष्म निरीक्षण परांजपे यांनी नकळत नोंदवले आहे. त्यात मराठीचे बेगडी प्रेम अधोरेखित झाले आहे. मराठी भाषादिन हा एका दिवसात आटोपण्याचा विषय न राहता तो वर्षभर साजरा करावा, असे श्रीमती परांजपे म्हणाल्या. मराठीचा उदो-उदो करणारे प्रसंगी या भाषेवर अन्याय करीत असतात. भाषेचे नियम, सौंदर्यस्थळे, जमेच्या बाजू, व्यवहारातील तिचे स्थान, प्रभावी संवादासाठी तिचा यथेचित वापर, वगैरे बाबींकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असे श्रीमती परांजपे यांना सुचवायचे असेल. मराठीबाबत भावनाप्रधान (की भावनाविवश) होऊन भाषणे देणारेच अनेकदा मराठीचे अक्षरशः लचके तोडत असतात. व्याकरण आणि उच्चार याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असते. अनेक शाळा-महाविद्यालयांत मराठीचे शिक्षक-प्राध्यापक यांचे भाषेबाबतचे मूल्यमापन केले तर मराठी भाषेला फार चांगले दिवस पहायला मिळतील असे वाटत नाही.
मराठी भाषेला संजीवनी मिळवून द्यायची असेल तर भाषादिनासारखे उपक्रम अधिक गांभीर्याने आणि औपचारिकतेपलिकडे जाऊन साजरे व्हायला हवेत. भाषेबद्दल आस्था तिची किती प्रामाणिकपणे आपण आराधना करतो यावर अवलंबून असते. श्रीमती परांजपे यांनी चित्रपटातील कलाकार जसे दोन संवादांमध्ये बरेच काहीच न बोलता बोलून जातात, तसे विचार मांडले आहेत.