फास्ट फूड खाताय…?

चटपटीत खाणे हा जणू बदलत्या जीवनशैलीचा भाग बनला आहे. यातूनच ‘फास्ट-फूड’च्या नावाने खाद्यपदार्थांची झपाट्याने विक्री होत असते आणि त्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. हे सर्व पदार्थ घरपोच करण्यासाठी स्विगी, झोमॅटो आणि तत्सम ‘खाद्यदूत’ अहोरात्र सेवा देत असल्याने दिवसाच्या (आणि हो रात्रीच्याही) कोणत्याही प्रहरी तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्याची मोठी यंत्रणा गेल्या काही वर्षांपासून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

एखादा पदार्थ खाण्याची नुसती इच्छा झाली तरी काही क्षणांत मनाची आणि अर्थात पोटाची तृषा शांत होते. या व्यवसायातील उलाढालीचे आकर्षण अनेकांना या क्षेत्राकडे मोहीत करीत आहे आणि त्यामुळे सहाजिकच स्पर्धाही वाढली आहे. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काही व्यावसायिक अनिष्ट मार्गाचा अवलंब करताना अलिकडेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या जाळ्यात अडकले. जो मासा या कारवाईत गावला तो चक्क आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेला मॅकडोनाल्ड होता हे धक्कादायक.

अहमदनगर येथे प्रशासनाने टाकलेल्या धाडीत मॅकडोनाल्ड बर्गरमध्ये पनीरऐवजी चीज अ‍ॅनालॉग्स सापडले! या धक्कादायक प्रकरणानंतर राज्यातील मॅकडोनाल्ड आणि अन्य कंपन्यांची 30 उपहारगृहे तपासण्यात आली. त्यात मुंबईच्या 13 उपहारगृहांचा समावेश होता. या कारवाईत निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ वापरले जात असल्याचे आढळून आले. प्रशासनाने जारी केलेल्या माहितीत अनेक प्रसिध्द आणि तथाकथित प्रतिष्ठित साखळी उपहारगृहे अशा आरोग्याला हानीकारक वस्तूंचा वापर करीत असल्याचे समोर आले. आता त्यांच्यावर रीतसर कारवाई होईल, हे मान्य केले तरी गुणवत्तेचा टेंभा मिरवणारे हे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड भारतातील ग्राहकांच्या जीवाशी किती काळापासून खेळत होते हे समजायला हवे. त्यांची ही गडबड लक्षात आली नसती तर हा प्रकार सुरूच राहिला असता. अन्न आणि औषध प्रशासनाचे सतर्कतेबद्दल कौतुक करायला हवे.

भारतात ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करणारे कायदे आणि यंत्रणा अस्तित्वात असली तरी असे अनुचित प्रकार सुरू असणे आपल्या कारवाई प्रक्रियेबद्दल शंका निर्माण करुन जाते. अन्य देशांत असा खोडसाळपणा गुन्हा समजला जातो आणि त्याविरुध्द कठोर कारवाईही होत असते. अर्थात सहिष्णुता आणि गुन्ह्यास माफ करण्याची परंपरागत वृत्ती असल्यामुळे अशा चुकीच्या प्रकरणांकडे कानाडोळा केला जातो. कायदा विकत घेतला जाऊ शकतो हा विश्वास लहान-मोठ्या भुरट्या चोरांची भीड चेपत राहतो. जगविख्यात ब्रॅण्डने अशी चोरी करावी याचे आश्चर्य वाटते. भारतीय व्यवस्थेला गृहीत धरण्याच्या या आंतरराष्ट्रीय वृत्तीचा बिमोड व्हायला हवा. अर्थात त्यासाठी आपली यंत्रणा कडक असायला हवी. कोणतीही दयामाया न दाखवता कारवाईचा बडगा उचलला गेला तर भेसळ करण्याची कोणी हिंमत करणार नाही. या ब्रॅण्डना आपण दरवाजे उघडले म्हणून त्यांनी वाट्टेल तसा हैदोस घालू नये. या बातमीमुळे ग्राहकांचे डोळे उघडले असतील. ही अपेक्षा.