पिझ्झा मागावताय? जरा सांभाळून

चेन्नई येथील डोमिनोज इंडिया या प्रमुखा पिझ्झा वितरक कंपनीचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे सुमारे १८ कोटी ऑर्डर्सचा तपशील गैरमार्गाने उघड झाला आहे. ही अत्यंत गोपनीय माहिती हॅकरने सर्व्हरमध्ये प्रवेश करून मिळविल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोणी, कधी आणि कुठे ऑर्डर नोंदवली होती, डिलिव्हरी झाली तो पत्ता, पैसे कसे अदा झाले होते वगैरे तपशील हॅकरच्या हाती लागला आहे. त्यामुळे दोन धोके संभवतात. एक तर ग्राहकांचा आर्थिक स्त्रोत उघड होऊ शकतो आणि दुसरे म्हणजे ग्राहकाची क्रयशक्ती लक्षात घेऊन ती डोमिनोजच्या प्रतिस्पर्ध्याला किंवा गृहोपयोगी उत्पादन क्षेत्रातील अन्य उत्पादकांना पुरवली जाऊ शकते. ग्राहकांच्या तयार यादीत विपणन विभागाला रस असतो आणि त्याकरिता ते मोठी रक्कम द्यायला तयार होतात. तसे झाले तर डोमिनोजचे मोठे नुकसान होऊ शकते. सायबर गुन्हे कसे गंभीर रूप धारण करू शकतात आणि त्याबाबत कशी काळजी घेणे आवश्यक आहे असे दोन धडे तपासयंत्रणेला मिळाले. खास करून कोरोनाकाळात ऑनलाईन खरेदीचा पर्याय लोकप्रिय होत असताना हॅकिग करणारे सातत्याने नवनवीन लक्ष्य शोधत राहणार. त्यांच्या जाळ्यात ग्राहक बेमालुमपणे अडकू शकतात.
सध्या सरकार आणि फेसबुक यांच्यात व्हॉटस्अ‍ॅपच्या गोपनियतेवरून तंटा सुरू आहे. या सुविधेचा वापर करणार्‍यांकडून सावधगिरी बाळगली जाणे आवश्यक आहे. परंतु तंत्रज्ञानाच्या जितक्या झपाट्याने प्रसार झाला आहे तितक्या वेगाने तंत्रसाक्षरता पसरली नाही. त्यामुळे ज्या अटीशर्थी (न वाचता) सर्वसामान्य नागरीक मान्य करून बसतील त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांची पत आदी खाजगी माहिती व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून फेसबुककडे जमा होऊ शकेल. या माहितीचा दुरुपयोग होणे म्हणजे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकते. अशी भूमिका सरकारने घेऊन फेसबुकला या अटीशर्थीची तरतुद रद्द करण्याचा आग्रह धरला आहे.
एकीकडे सरकार नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असताना असे सायबर गुन्हे होऊन बेसावध ग्राहक सापळ्यात अडकणार नाही याची मात्र खबरदारी घेतली दिसत नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाईलही, परंतु लहान-मोठे सायबर गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, अशी आम जनतेची तक्रार आहे. स्थानिक पोलिस याबाबत अनभिज्ञ आहेत आणि त्यामुळे उदासिन.डेबिट-क्रेडिट कार्डांवरून फसवणुकीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. बनावट कंपन्या बेसावधपणे ग्राहकांकडून महत्वाचा तपशिल घेऊन मोकळे होतात. कधी आधारकार्डचा नंबर दिला जातो तर कधी बँकेचे तपशिल. काही क्षणात हातचलाखी व्हावी तसे खात्यातून पैसे लुटले जातात. पोलिसांनाही या गुन्ह्यांच्या ‘मोडस्-ऑपरंडी’बाबत फारसे अवगत नसते. त्यामुळे तपासात दिरंगाई होते. सायबर गुन्ह्यांना हलक्यात घेण्याचे दिवस संपले आहेत.