दुसरे स्वातंत्र्य

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या शिरकावानंतर देशात लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे अवघा देश सुटकेचा निःश्वास सोडणार आहे. महासाठीच्या आगमनापासून ती रुद्रावतार धारण करेपर्यंत भीतीचे वातावरण, मृत्यूचे तांडव आणि वैद्यकीय व्यवस्थेवर पडलेला ताण, अचानक ओढवलेल्या आपत्तीमुळे यंत्रणांची उडालेली दाणादाण, त्यांच्यातील त्रुटी, औषधे आणि प्राणवायूचा पुरवठा ते परप्रांतीयांची स्थलांतरे दैनंदिन प्राथमिक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि तुटवडा अशा असंख्य समस्यांनी वातावरण ढवळून निघाले होते. माणसाच्या आरोग्याला झळ बसत असताना अस्तित्वाची लढाई लढण्याची पाळी आली होती. या अग्निदिव्यातून आता सुटका होऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. म्हणूनच सरकारने ३१ मार्चपासून निर्बंधमुक्तीचा निर्णय घेतला आहे. कोरोनापूर्व काळातील मुक्तपणे जनतेला अनुभवता यावा आणि त्यांनी गेल्या दोन वर्षांचा केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक अनुशेष भरून काढावा ही शासनाची इच्छा आहे. अर्थात मुखपट्टी आणि अंतरनियम पाळावेच लागणार आहेत. 
 
कोरोना काळाने माणसाला बरेच नवे धडे शिकवले. त्यापैकी सर्वात महत्वाचा होता सार्वजनिक स्वच्छतेचा आणि किमान शिस्त पाळण्याचा. एका परीने या दोन्ही आघाड्यांवर भारतीयांची कामगिरी निराशाजनकच आहे. हा धंदा कधीच विसरता काम नये. महासाथ असो वा नसो, परंतु तिचा प्रतिकार करण्यासाठी स्वच्छतेचे आचरण करावेच लागणार. या महास्थीमुळे माणसांचे खच्चीकरण मोठ्या प्रमाणात झाले. त्याचा विपरीत परिणाम त्याच्या प्रतिकारशक्तीला झाला. जे मृत्यू झाले त्यात सहव्याधी असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. या सहव्याधींना नियंत्रणात ठेवण्याचे मोठे शिक्षण कोरोनाने दिले. आरोग्य आणि आहार संतुलित रहावा याकरिता किमान शिस्त पाळण्याचा संदेशही कोरोनाने दिला. ही शिस्त सकारात्मक मानसिकता, आहार आणि आरोग्य याकरिता स्वयंनिर्बंध मात्र पाळावे लागतील. 
 
दोन वर्षे पिंजऱ्यात बंदिवान करून ठेवलेल्या पक्षाला दरवाजा उघडल्यावर काय वाटेल याचा प्रत्यय निर्बंधमुक्तीनंतर माणसालाही येणार आहे. परंतु म्हणून या नवस्वातंत्र्याचा गैरफायदा उठवता काम नये. ही खूणगाठ बांधून प्रत्येक माणसाने जबाबदारीचे भान ठेऊन नव्याने सुरुवात करायला हवी. 
 
काळजी आणि अती-काळजी यामधील अंतर सुज्ञपणे ओळखून प्रत्येकाने आपापली लक्ष्मणरेषा ठरवली तर कोरोना नावाचे दुस्वप्न अखेर संपले असे म्हणता येऊ शकेल. दोन वर्षांनी शाळेत गेलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित इतकेही स्वस्त नाही की बेजबाबदारीने पुन्हा संकटाला निमंत्रण देण्यासारखे आपले वर्तन ठरावे. कोरोनामुक्त जगाच्या जबाबदार नागरिकांना निर्बंधाचे पालन करण्यासाठी मागे लागावे लागू नये म्हणजे आपण बरेच शिकलो असे म्हणता येऊ शकेल.