एक प्रसन्न बातमी!

मुरबाड तालुक्यातील कान्हार्ले गावातील प्राथमिक शिक्षक मंगलदास आणि सौ. मीनल कंटे यांचा मुलगा प्रसन्न याची इंदौरच्या आयआयटीमध्ये निवड झाली आहे. अत्यंत मानाच्या अशा या संस्थेत प्रवेश मिळवणे सोपे नसते. त्यासाठी विद्यार्थी प्रज्ञावंत तर असावा लागतोच. परंतु ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड परिश्रमही करावे लागतात. प्रसन्नने हे आव्हान पेलले आणि तेही मुरबाडसारख्या मुंबईच्या तुलनेत उपेक्षित अशा भागातून याचे मनस्वी कौतुक वाटते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध नसतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. प्रसन्न नो ही जिद्द दाखवली आणि आव्हान पेलले याबद्दल त्याचे आणि त्याच्या शिक्षकी पेशात असलेल्या आई-वडीलांचे कौतुक वाटते. त्यांनी आवश्यक त्या सुविधापासून प्रसन्न वंचित रहाणार नाही याची काळजी घेतली असणार. हजारो विद्यार्थी घडवणार्‍या या शिक्षक-दाम्पत्य घरात एक लखलखीत ज्ञानदीप प्रज्वलित झाला आहे. पालक म्हणुन त्यांच्याकरिता हा निश्‍चितच मोठा भाग्याचा क्षण आहे.

आम्हाला प्रसन्नाचे यश पाहून समाधान याचे वाटते की देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आपण शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कमनशिबी आहोत. म्हणुन रडत बसत नाही. हात-पाय गाळून बसण्याऐवजी पंखांमध्ये जिद्द आणि परिश्रमाचे बळ साठवून ते उंच भरारी घेण्यास सज्ज आहे. ते स्वप्न पहात आहेत आणि ती साकार करण्याचा ध्यास बाळगत आहेत. शिक्षण क्षेत्रातील उणिवांमुळे आणि गैरव्यवहारांमुळे त्याबद्दल टीकेची झोड उठवली जात असते. परंतु कधी तरी प्रसन्नासारखी उदाहरणेही पुढे येत आहेत. विशेष म्हणजे त्याच सदोष शिक्षण व्यवस्थेतून हे चमत्कार घडत असतात. यास कारण कौटुंबिक वातावरण, शैक्षणिक संस्कार आणि देशाच्या प्रगतीत आपलाही सहभाग असावा ही असोशी!

प्रसन्नचे येत्या काही दिवसांत सत्कार सोहळे होतील. परंतु आयआयटीसारखे शिक्षण महाग असते. प्रत्येक सत्राची फी किमान सव्वा ते दीड लाख रुपये असते. प्राथमिक शिक्षक असणार्‍या पालक हा भार सोसतीलही. परंतु अशा वेळी सरकारचे उत्तरदायित्वही वाढते. मुरबाडमध्ये औद्योगिक वसाहती निर्माण करणार्‍या शासनाने एकादा भूमीपुत्र अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावत असेल तर त्याला मदतीचा हात द्यायला हवा. काय सांगावे प्रसन्नसारखे तरुण उद्या मुरबाडला जागतिक नकाशावरही आणू शकतील!