भयग्रस्त सारे 

अपघात सांगून येत नसतात, त्यामुळेच तर त्यांना आपण अपघात म्हणत असतो. अशा दुर्घटनांना ‘जर-तर’च्या फुटपट्टींनी मोजता येत नसते, कारण प्रत्येक अपघात वेगळ्या परिस्थितीत होत असतात. त्यात काही साम्यस्थळे आढळली तरी ती ढोबळमानाने त्या दुर्घटना टाळण्यासाठी पुरेशी नसतात. त्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहते आणि माणूस नशिबावर हवाला ठेवून अपघातात आपण नसावे ही प्रार्थना करीत राहतो. इतकी प्रगती करून मनुष्य तरी इतका हतबल कसा या प्रश्नाला उत्तर नाही. कारण पुन्हा जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती! त्यामुळे आणीबाणीत कोणाची काय प्रतिक्रिया असेल हे सांगता येत नाही. मग तो प्रसंग प्रार्थनास्थळातील चेंगराचेंगरीचा असो की रेल्वे अपघाताचा. जळगावजवळ बुधवारी झालेला प्रकार, अशा आपत्कालीन परिस्थितीत माणसांनी कसे वागावे, मनात उद्भवलेले हे भय कसे काबूत ठेवावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेबरोबर आपल्या समवेत असलेल्या समूहाची सुरक्षितता कशी साध्य करावी याचा विचार करण्याची सवय लोप पावल्याचे प्रकर्षाने जाणवले. स्वतंत्र विचार करण्याची कुवत समाज घालवून बसला आहे काय की कळप-संस्कृती त्याला अधिक आश्वासक वाटू लागली आहे, हे कळत नाही. सार्वजनिक अडाणीपणा व्यक्तिगत शहाणपणाला, निर्णयप्रक्रियेला स्वतःचे भले-बुरे कशात आहे हे विचार करण्यापासून माणसाला परावृत्त करीत आहे, असेच म्हणावे लागेल.

भारत प्रगती करीत आहे, महासत्ता होऊ पाहत आहे वगैरे वल्गना ठराव्यात इतके अपरिपक्व आणि अडाणीपण समाजात व्यक्त होत आहे. मुंबईसारख्या महानगरात काही वर्षांपूर्वी पूल-दुर्घटनेत अशीच परिस्थिती उद्भवली होती. कोणीतरी ओरडले पूल पडतोय आणि त्यातून घबराट निर्माण झाली आणि देशाच्या आर्थिक राजधानीत मानवी स्वभावाचा कमकुवतपणा सर्वत्र सारखा असतो याचे दर्शन दिले!

माणूस सतत भयगंडात का वावरत आहे याचा विचार अशा अपघातातील चौकश्या, भरपाई आणि त्यावरून होणारे राजकारण आदी उपचार संपल्यावर करावा लागेल. समाज नेहमी भयग्रस्त असावा अशी रचना आपल्या व्यवस्थेत कळत-नकळत होत आहे काय, या प्रश्नालाही सामोरे जावे लागेल. आपल्या अवतीभोवती जणू काही चांगले सुरूच नसून आपल्या जीवाला कायम धोका आहे हे बिंबवले जात असून ही समाज-व्यवस्था बदलण्याची गरज आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार होणारे निरपराध असोत की युद्धात बळी जाणारे नागरिक, जगात सतत कुठे ना कुठे मृत्यू थैमान घालत असल्यामुळे भीती आणि मानवी जीवनाचे कवडीमोल मूल्य यामुळे लोकांना मरण स्वस्त वाटू लागते. उड्या मारणाऱ्या प्रवाशांना मृत्यू गाठू शकतो याची भीती न वाटण्यामागे हेच खरे कारण आहे.