खूप वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे, बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलिकडे दिलेल्या निकालावरून झाली. २०१७ मध्ये विना परवाना आणि विना हेल्मेट दुचाकी चालवल्याच्या प्रकरणात या तरुणाला अभिनव शिक्षा देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चार रविवारी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत या तरुणाने सेवा द्यायची आहे. तसेच त्याचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी पोलिसांकडे जमा करायचा आहे आणि हेल्मेट घालेन, अशी लेखी हमी द्यायची आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. परंतु न्यायालयाने कायद्यातील तरतुदींपेक्षा या गुन्ह्यातील अन्य सामाजिक आयामांचा विचार केलेला दिसतो आणि ते स्वागतार्ह आहे. या मुलाच्या आईविरोधात एफआयआर दाखल होतो. तो रद्द करताना न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ‘इन डिफेन्स ऑफ ॲनिमल’ या संस्थेकडे जमा करण्यास सांगितले. याचिकाकर्त्याने या तरुणाचे शिक्षण आताच पूर्ण झाले असून तो नोकरीच्या शोधात आहे असे नमूद केले. तसेच त्याच्या भवितव्याचे नुकसान होऊ नये म्हणून एफआयआर रद्द करण्याची भूमिका न्यायालयाने घेतली. न्यायालयाचा हा दृष्टिकोन अभिनवच म्हणायला हवा आणि अशा निकालाची पुनर्रावृत्ती झाली तर समाजात एक नवा पायंडा पडू शकतो. दोषींना शिक्षा हा मर्यादित अर्थ न्यायालयांच्या कामातून अपेक्षित असला तरी समाजात परिवर्तन होऊन त्याच-त्या गुन्ह्यांची पुनर्रावृत्ती थांबवायची असेल तर वेगळा विचार होणे तितकेच अगत्याचे आहे.
सर्वसामान्यपणे वाहतुकीच्या शिस्तीचा बट्ट्याबोळ झाला आहे यावर कोणाचेच दुमत नाही. त्याला असंख्य कारणे आहेत आणि त्यांच्या खोलात गेलो तर संबंधित खाती एकमेकांकडे बोटे दाखवण्याखेरीज काही करणार नाहीत. वाहनांची संख्या वाढत चालली आहे आणि रुंद रस्ते आणि उड्डाणपूल हे अपुरे पडू लागले आहेत. अशावेळी वाहतुकीने शिस्त पाळली तर या उपाययोजनांचा परिणाम दिसू शकेल. परंतु त्या आघाडीवर एकूणच आनंद आहे. तीन चाकी, दुचाकी, चार चाकी, टांगे, सायकली, हातगाड्या, मालवाहू वाहने, बसगाड्या, टँकर आदी तुम्ही म्हणाल की भिन्न आकाराची आणि तितक्याच भिन्न चालकांच्या शैक्षणिक क्षमतेची वाहने वर्दळ करतात. अशावेळी पोलीस बळ अपुरे पडते ही नेहमीची ओरड आणि पोलीस नाहीत म्हणजे कायदा मोडण्याचा जणू परवानाच! अशावेळी स्वयंशिस्त पाळली जाणे गरजेचे आहे. हे शिक्षण लहान वयात मिळायला हवे. परंतु लहान मुलेच आई-बाबा सिग्नल तोडत असल्याचे पाहत असल्यामुळे त्यांच्यावर काय बोडक्याचे संस्कार होणार? यामुळे पादचाऱ्यांचा विचार न करता वाहने दामटवली जातात आणि वाहतूक कोंडी, अपघात, शाब्दिक शिवीगाळ वगैरे प्रकार नित्याचे झाले आहे. अशावेळी या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेने न्यायालय पाहत असेल तर त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही याची आपण जबाबदार नागरिक म्हणून काळजी घेऊ या. काय सांगावे या प्रकरणातील तरुण उद्या जबाबदारीने वाहन चालवूही लागेल!