फार्स संपणार ?

अनधिकृत बांधकामांना पुढार्‍यांचा अभय असतो. सत्तेवर असो वा नसो, पुढार्‍यांचा आशिर्वादाशिवाय अनधिकृत बांधकामे होत नसतात हे देशातील कोणत्याही शहरातील शेंबडे पोरही सांगेल. त्यामुळे अशा बांधकामांविरूद्ध कारवाई कायम फार्स ठरत आली आहे. आता मात्र परिस्थिती बदलेल असे आशादायक चित्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसते. दबावाखाली न येता युद्धपातळीवर कारवाई करण्याचे आदेशच त्यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत.
श्री. ठाकरे यांच्या आदेशामुळे कायद्याचे पालन करणारे नागरीक खुश होतील. अर्थात ही घोषणा आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेऊन केली नसल्याचा प्रत्यय मुख्यमयंत्र्यांना द्यावा लागेल. शहराचे बकालीकरण थांबवले पाहिजे आणि त्यासाठी नियोजनबद्ध विकास व्हायला हवा, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असले तरी सर्वच राजकीय पक्षांचे आर्थिक हीतसंबंध त्यांची घोषणा प्रत्यक्षात आणण्यात अडथळा निर्माण करू शकते.
मुख्यमंत्र्यांनी मनात आणले तर ते मुंबईचे चित्र बदलू शकतील, त्यांच्याकडे संशयाने पहाण्याऐवजी विरोधी पक्षांनी स्वागत करायला पाहिजे आणि प्रत्यक्ष कारवाईची योजना जाणून व्हायला हवी, तसे करण्यातच शहाणपणा आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दिलासादायक घोषणेचे राजकारण व्हायला वेळ लागणार नाही. एकदा का राजकारण शिरले की ही घोषणा हवेत विरून जायला वेळ लागणार नाही.
भाजपाच्या नेत्यांनी श्री. ठाकरे यांच्या घोषणेची थट्टा केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांवर भाबडेपणाचे ‘नाटक’ करीत असल्याचा आरोप केला आहे. श्री. ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे बेकायदा बांधकामात हात गुंतले असताना त्यांची घोषणा कागदावरच राहील असेही विरोधकांचे म्हणणे आहे. हे कितीही खरे मानले तरी एक संधी द्यायला काय हरकत आहे. राजकारण करण्यासाठी आणखी बरेच विषय आहेत. काही बाबतीत तरी राजकारण दूर ठेवायलाच हवे. भाजपा नेत्यांनी श्री. ठाकरे यांच्या कारवाईचा लेखाजोखा ठेवावा. तसे ते करीत नसतील तर तेच या कारवाईत खो घालत आहेत असा गैरसमज पसरू शकतो.
सध्या राजकारणात भ्रष्टाचारावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कलगीतुरा रंगला आहे. एकाने दुसर्‍याची लक्तरे वेशीवर टांगली की दुसर्‍याने आरोप करणार्‍यांचे तोंड बंद करण्यासाठी जुनी मढं उकरण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे मंडळी खरोखरीच भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामांविरूद्ध आहेत की जनतेच्या डोळ्या धूळ फेकण्याचा प्रयत्न पुढारीमंडळी करीत आहेत? बघुया मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुंबई महापालिका किती युद्धपातळीवर कामाला लागते ते!