बेरजेचे राजकारण बाहेरुन जितके सोपे दिसते तसे ते प्रत्यक्षात नसते. राजकीय पक्षांचा उल्लेख ‘दुकाने’ असा नकारात्मक भावनेतून होत असला म्हणून नेते दुकानदारासारखे ‘पुड्या’ बांधताना किंवा आपला ‘माल’ विकल्यावर कॅलक्युलेटरवर हिशेब करुन मोकळे होऊ शकत नाहीत. हा कॅलक्युलेटर त्यांना ऐनवेळी दगाही देऊ शकतो. चाचणी सर्वेक्षणवाले कधीकधी असे कॅलक्युलेटर वापरत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेतल्यावर भाजपाच्या उत्तर भारतीय गोटाकडून त्यास विरोध होऊ लागला आहे तर रामदास आठवले यांनी मनसेच्या उपयुक्ततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बारामतीत शिवतारे वि. पवार, भिवंडी मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील आणि आ. किसन कथोरे यांच्यातील कथित शीतयुद्ध, अमरावतीत नवनीत राणा यांना वाढता विरोध तर सांगलीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) गटांत सुरु असलेली धुमश्चक्री या ठळक घटनांप्रमाणे सर्वच मतदार संघात महायुती आणि महाआघाडीत पसरलेली अस्वस्थता बेरजेच्या राजकारणाला शह देण्याचीच शक्यता वर्तविली जात आहे.
बेरजेच्या राजकारणात केवळ गणित पक्के असून चालत नसते, त्यासाठी एकत्र येणाऱ्या परस्परविरोधी विचारसरणीच्या नेत्यांचे रसायनही जमवावे लागते. ‘It is not just matter of mathematics, it is beyond that where chemistry too matters,’ असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. बेरजेची खुण वापरली की बेरीजच होत असते. परंतु कोणते रसायन कोणत्या पदार्थाच्या संपर्कात आल्यावर काय ‘रिअॅक्शन’ होईल हे सांगता येत नाही. उत्तर भारतीय समाजाचे आणि मनसेचे वैर नवीन नाही. त्यामुळे जी प्रतिक्रिया उमटली ती भाजपा नेत्यांसाठी अनपेक्षित होती असे म्हणता येणार नाही. प्रश्न हा आहे की त्यामुळे बेरजेचा हेतू सफल होईल काय? सांगता येत नाही.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावलेला मनसे त्यांच्या भूमिका, विशेषत: स्थलांतरितांबाबतचा प्रतिकूल दृष्टीकोन बदलणार आहे का? लोकसभेत स्थानिक अस्मिता किंवा प्रादेशिकता यांस दुय्यम महत्व असले तरी भविष्यात होणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्मिताच दुकानाच्या काऊंटरवर ठेवावी लागणार आहे. ती शुद्ध असायला हवी ही ग्राहकांची (मतदारांची) अपेक्षा असणार. भेसळयुक्त अस्मितेला ग्राहक मिळणे तसे कठीणच. अस्मिता ही प्रादेशिकतेशी इमान राखत असते तर हिन्दुत्व ही संकल्पना अस्मितेला व्यापक (धार्मिक) रुप देऊन बाजारात येत असते. अस्मिता, ‘अब नए पॅक में,’ अशी जाहिरात करुन ग्राहकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करावे लागतात. राज ठाकरे हे रोखठोक बोलणारे आहेत. ते अन्य दुकानदारांप्रमाणे खोटे बोलून माल विकणार नाहीत. अशावेळी काही ग्राहक पाठ फिरवतीलही. भाजपा नेत्यांना ते चालणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. महायुतीला इंजिन तर मिळाले, पण डबे घसरणार नाहीत याची त्यांना काळजी घ्यावी लागणार. उत्तर भारतीय बांधवांनी हिरवा बावटा दाखवण्यााऐवजी लाल बावटा दाखवून भाजप नेत्यांची थोडी गोचीच केली आहे!