दम सुका ठरू नये

काम करा अन्यथा मंत्रिपद जाणार असा दम अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दणदणीत मताधिक्य मिळवणाऱ्या आम आदमी पार्टीच्या सरकारमधील मंत्र्यांना भरला आहे. आदर्श राज्यव्यवस्थेची भोळी आशा बाळगणारे केजरीवाल यांच्या पवित्र्यामुळे भारावून जाणे स्वाभाविक आहे. निवडून आलेला मंत्री असो की नगरसेवक त्यांना जाब विचारण्याचा अधिकार मतदारांना नसतो. त्यामुळे अशा हतबल जनतेच्या मनातील आशेला केजरीवाल यांनी बळकटी दिली आहे. प्रत्यक्षात तसे झाले तर जनतेचा राजकारण्यांवरही विश्वास वाढेल. केजरीवाल यांच्या या भूमिकेचा त्यादृष्टीनेही विचार करावा लागेल. 

दिल्लीमधील कामगिरीच्या जोरावर आपला पंजाबच्या मतदारांनी संधी दिली आहे. राजकारणापासून दूर राहू लागलेल्या जनतेला ‘आप’ने एकत्र आणले आणि प्रस्थापित कितीही बलवान असला तरी त्याला पराभूत करता येतो हा आत्मविश्वास जागवला. एका छोटेखानी पक्षाने दोन राज्ये जिंकावीत ही निश्चितच लक्षणीय बाब आहे. प्रादेशिक पक्षांचे तथाकथित मुत्सद्दी, परिपक्व वगैरे नेतेही तोंडात बोटं घालून बसले आहेत. दिल्ली पाठोपाठ पंजाब काबीज करणाऱ्या ‘आप’चे पुढचे लक्ष्य गुजरात आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी खरोखरीच अकार्यक्षम मंत्र्यांची झाडाझडती घेऊन त्यांना नारळ दिला तर ‘आप’च्या प्रेमात पडणाऱ्या मतदारांची संख्या वाढू शकते. 

जे केजरीवाल बोलले ते यापूर्वी राष्ट्रीय पक्षांच्या बड्या नेतेही बोलून गेले आहेत. परंतु त्यांनी दिलेला इशारा त्यांच्या मंत्र्यांनी गांभीर्याने क्वचितच घेतला. हा सुका दम कसा दुर्लक्षित करायचा आणि मंत्री झाल्यावर आपला स्वार्थ कसा साधत राहायचा यावर बहुसंख्य मंत्री लोकांमध्ये एकवाच्यता दिसून येते. कार्यक्षमता आणि धडाडी या मंत्र्यांनी जरूर दाखवली पण भ्रष्टाचारात आणि व्यक्तिगत उत्कर्षासाठी ! या ‘पवित्र’ आणि कारे तर ‘विहित’ कामात त्यांनी श्रेष्ठींना सामावून घेतले. उत्तरदायित्वाचा जाब विचारणाऱ्यांचीच तोंडं शिवल्यावर मोकळे दान नाही मिळणार तर काय ! केजरीवाल यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पारंपरिक नेत्यांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला दम सुका ठरू नये. 

एक त्रुटी मात्र त्यांच्या या भूमिकेत दिसते. ‘आप’ला मिळत असलेले जनसमर्थन भले आज मोठ्या पक्षांना आणि अस्मितेच्या जोरावर धुडगूस घालणाऱ्या अनेक दिशाहीन प्रादेशिक पक्षांपेक्षा कमी असेल, पण समर्थनात ‘जन’ हा विकासाने प्रेरित आहे. पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने प्रेरित आहे. त्यांना उत्तरदायित्व हवे आहे. केजरीवाल यांनी या जनभावनेचा विचार केला ते बरे झाले. पण या प्रक्रियेत जनसहभाग त्यांनी घेतला तर अधिक उत्तम होईल. मतदानानंतरही जनतेचे मत असते, त्याचा विचार करायलाच हवा.