सरनाईकांचे पत्र

एकीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून भाजपाशी जुळवून घेण्याचा विचार मांडला असताना, भाजपा त्याबाबत कोणती प्रतिक्रिया देतो हे पहावे लागेल. तुर्तास त्यांनी प्रथमदर्शनी समर्थन केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेना फोडत असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केल्यामुळे महाविकास आघाडीला हादरा बसणार आहे. थोडक्यात महाविकास आघाडीचा प्रयोगावर ते नाराज आहेत,हे स्पष्ट होते. या तथाकथित लेटर बॉम्बवर सेनेप्रमाणेच अन्य तीन पक्ष कोणती प्रतिक्रिया देतात यावर आगामी काळातील राजकारण अवलंबून असेल. भापाला अशी प्रतिक्रिया सेनेतून उमटणे भावले आहे. पण ते भारावून जाणार नाहीत. ज्या क्षणाची ते वाट पहात आहेत, तो समीप येऊ लागला म्हणुन उतावळीपणा दाखवणे ते टाळतील. त्यामुळे ते लगेच टाळी देतील असे नाही. युती तोडणाऱ्या सेनेला इतक्या सहजासहजी माफ करणे आणि दिलजमाई करणे त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. सरनाईकांचे म्हणणे व्यक्तीगत मानले तर सेना त्याचा कितपत पाठपुरावा करील याबद्दल शंका आहे. त्याबाबत खातरजमा करूनच सेनेच्या संभाव्य प्रस्तावाचा विचार होईल. या पत्रामागे मोदी-ठाकरे भेटीचा संबंध नाकारता येणार नाही. शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ठाकरे यांनी भाजपाला ही टीकेचे लक्ष्य केले होते,हे विसरून चालणार नाही. उभय पक्षांत दरी वाढली आहे. सरनाईकांचे पत्र प्रसिद्ध झाले त्याच दिवशी म्हणजे सोमवारी भाजपाने पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेतील गैरव्यवहारास संपूर्णपणे सेनाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सरनाईक यांच्या पत्रावर त्यामुळे भाजपा प्रतिसाद देण्यासारखे वातावरण नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आ.सरनाईक यांच्या पत्राची गंभीर दखल घेतील, असे वाटत नाही. त्यांनी आपला पक्ष सोडून सेनेत प्रवेश केला होता. भाजपा-सेना यांचे सूर जुळले तर राष्ट्रवादीला सत्तेपासून वंचित रहावे लागणार. राष्ट्रवादी तसे होऊ देणार नाही आणि सेनेवर दबाव वाढवत राहणार. सेनाही त्यांची साथ सोडेल असे वाटत नाही. त्या दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा तर विचारही केला आहे. सरनाईकांच्या पत्रामुळे सेना आणि राष्ट्रवादीत दुरावा होईल असे काँग्रेसला वाटत आहे. त्याचा त्यांना प्रत्यक्ष लाभ होणार नसला तरी मतदारांच्या मनात राष्ट्रवादी-सेना यांच्याबाबतीत किल्मिष होऊन ते आघाडीपासून दूर जातील ही आशा असणार.
सरनाईक यांचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातूनच फुटल्याचे काही पत्रकारांचे मत आहे. माध्यमांच्या हाती ते हेतुपुरस्सर जावे, अशी योजना तेथून आखण्यात आल्याचा बोलावा आहे.सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेला कथित त्रास भाजपाशी जुळवून घेतल्यावर कमी होईल,हा या पत्रामागचा प्राथमिक हेतू दिसतो. पण या व्यक्तीगत कारणांतून पक्षाचे धोरण बदलेल काय हा खरा प्रश्‍न आहे. शिवसेनेकडून खूप सावध प्रतिक्रिया आली आहे. खा. संजय राऊत यांनी पत्रातील आरोपांचा अभ्यास करावा लागेल एवढेच म्हटले आहे. त्यातून महाविकास आघाडी संपुष्टात येईल किंवा सरनाईक यांनी केलेल्या आरोपांत तथ्य नाही, असेही खा. राऊत म्हणालेले नाहीत. त्यामुळे सरनाईक यांच्या पत्रामागे त्यांची व्यक्तीगत हतबलता आहे की शिवसैनिकांचे मनोगत? हा ‘लेटर-बॉम्ब’ कुठे आणि कोणी बनवला यावरही चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील अंतर्विरोधास सरनाईक यांच्या पत्राने वात पेटवली आहे. एक तर त्याचा मोठा धमाका तरी होईल किंवा स्फोट होण्यापूर्वी वात विझून जाईल. भाजपाला धमाका व्हावा असे मनोमन वाटत आहे. पण ते योग्य वेळेची वाट पाहतील. ही वात कमी-जास्त करणे त्यांच्याच हाती आहे. या स्फोटात काही मंडळी जायबंद कशी होतील हे टाइमिंग अवलंबून असेल. काय सांगावे सेनेतील एक मोठा गट सामावून घेऊन ‘स्वबळावर’ सत्तेत येण्याचा भाजपाचा अंतस्थ हेतू असेलही!