केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मंडविया यांनी लोकसभेत विरोधकांना उद्देशून केलेले आवाहन त्यांच्याच भाजपालाही लागू होते. कोणत्याही आपत्तीचे राजकीय भांडवल करता कामा नये, असे आरोग्यमंत्री म्हणाले. ते योग्य आहे. कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा हेका विरोधक सातत्याने लावत असल्यामुळे त्यांना हे आवाहन करावे लागले. ज्या राज्यात भाजपा सत्तेवर नाही त्यांनीही तेथील सरकारांना वेठीस धरता कामा नये हे या आवाहनात अनुस्यूत मानायला हवे. अर्थात तरीही सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, गैरप्रकारास जबाबदार धरले जाणारच. विरोधी पक्षांनी सरकारच्या चुका दाखवताना आवश्यक ते पुरावे देण्याची तितकीच गरज आहे. हवेत गोळीबार म्हणजे राजकारण. कोरोनामुळे झालेले प्रत्यक्ष मृत्यू सरकारने लपवल्याचा आरोप वारंवार होत आहे . तसेच लसीकरणाच्या नियोजनातील ढिसाळपणा हाही विरोधकांचा टीकेचा मुद्दा आहे. या दोन्ही आघाड्यांवर सरकारला म्हणावे तसे यश आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. या त्रुटी सुधारण्याऐवजी विरोधकांनाच दोषी ठरवणे योग्य नाही. प्रत्येक आरोप हे राजकीय हेतूनेच प्रेरित असतात असे नाही. त्यात तथ्य असू शकते. विशेषतः खाजगी रुग्णालयांकडून होणारी लूट असेल किंवा ठेके देताना होणारा भ्रष्टाचार हे प्रकार निश्चितच आक्षेपार्ह असतात आणि त्यांना विरोधकांनी वाचा फोडली तर बिघडले कुठे?
ताजेच उदाहरण घ्या, मुंबई महापालिकेसाठी प्राणवायूनिर्मिती यंत्रणेचे काम सोपवलेल्या ठेकेदाराने ते मुदतीत पूर्ण केले नाही म्हणून विरोधी पक्षांनी केलेला आरोप अप्रस्तुत आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकुण ८४ कोटी रुपये खर्च करून १६ ठिकाणी प्राणवायुनिर्मिती यंत्रणा उभारण्याचे काम ठेकेदार वेळेत पूर्ण करीत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे विपक्षाला या ठेक्यात गैरव्यवहार झाल्याचा संशय येत आहे. महापालिकेची आणि पर्यायाने करदात्यांची फसवणूक होत असेल तर सत्तारूढ पक्षच त्याला जबाबदार आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील. पण त्याची झळ बसणार आहे ती सर्वसामान्य नागरीकांनाच. दुसर्या लाटेने हाहाःकार उडवला याचे कारण प्राणवायूची टंचाई हे होते. रुग्णांच्या नातेवाईकांना इतके दिवस औषधांसाठी वणवण करावी लागत होती. आता प्राणवायुच्या नळकांड्या मिळेल तेथून आणि पडेल त्या भावात अक्षरशः डोक्यावरून वाहून नेण्याची नौबत आली होती. हा जेमतेम तीन महिन्यांपूर्वीचा ताजा इतिहास सत्तारूढ पक्षाने विसरता कामा नये. त्यामुळे विरोधी पक्षाच्या टीकेचा श्लेष काढत बसण्याऐवजी ठेकेदार काम मुदतीत कसे पूर्ण करील याकडे लक्ष देणे शहाणपणाचे ठरेल.