कमळ आणि काटे !

नियोजन आणि शिस्त या आघाड्यांवर भाजपाचा हात धरण्याची कुवत सध्या तरी प्रचलित कोणत्याच राजकीय पक्षांत नाही. त्यापैकी नियोजनासाठी लागणारे कार्यकर्त्याचे ‘नेटवर्क’ आणि संघटनात्मक बांधणी या बाबी चोख पाळल्या जातात. ही काळजी शिस्तीच्या बाबतीत मात्र खचितच घेतली जात नाही. या बेशिस्तीचा ताजा नमुना चंडीगड महापौरपदाची निवडणूक. एका अतिउत्साही अधिकाऱ्याने भर सभेत आणि तेही कॅमेर्‍याच्या साक्षीने मतपत्रिकेत खाडाखोड करुन भाजपाचा उमेदवार ‘निवडून’ आणला! पराभूत झालेल्या ‘आप’ने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यांनी निकाल फिरवला. या सर्व घडामोडीनंतर ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांनी काढलेले उद्गार भाजपाचे वाभाडे काढणारे ठरले. ‘भाजपाला पराभूत करता येते हे या घटनेने दाखवून दिले,’ असे सांगून श्री. केजरीवाल यांनी समस्त विरोधी पक्षांची उमेद वाढवण्याचा प्रयत्न केला. निवडणुका जवळ येत असताना अशी चूक भाजपाकडून होणे त्यांच्या प्रतिमेस साजेशी ठरणार नाही. अर्थात हा अधिकारी भाजपाच्या आशीर्वादामुळे इतका बेजबाबदार वागला असे विरोधी पक्ष म्हणत जनतेमध्ये सत्तारुढ पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करणार.
भाजपा नेतृत्वाला अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार. अनेकदा पक्षनेतृत्व मौन बाळगत असताना एखादा दुय्यम दर्जाचा नेता काही तरी प्रक्षोभक आणि अपरिपक्व विधान करुन पक्षाला अडचणीत आणत असतो. असा फाजिल आत्मविश्वास हाही बेशिस्तीचाच भाग असतो. निवडणुकांच्या दिवसांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत रहाणार आणि ‘अरेला-कारे’चे प्रसंगही उद्भवत रहाणार. अशावेळी प्रतिक्रिया देण्याचे काम पक्ष वरिष्ठांवर सोपवणे केव्हाही चांगले असते. परंतु सत्तेमुळे आलेल्या आत्मविश्वासापायी हे भान सुटते. भाजपाचे लहान-मोठे कार्यकर्ते जे पक्षाची खरी ताकद असतात ते बेजबाबदार वर्तन करुन पक्ष पोखरत असतात.
प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच असते अशी जिद्द जरुर असावी. परंतु त्यासाठी नियमांची पायमल्ली किंवा पाशवी बळाचा वापर करणे योग्य नाही. चंडीगडच्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्याचा विसर पडला आणि तो चक्क भाजपाचा एजन्ट बनला. नागरीक म्हणून त्याची भाजपाला पसंती असण्यात गैर काही नाही, परंतु मतपत्रिकेत खाडाखोड करणे हे नि:पक्ष अधिकाऱ्याचे लक्षण नसते. हे तो कसा विसरला? शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या चौकटीत काम करायला देणे हे शहाणपणाचे ठरेल. चंडीगडच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या शरीरात पक्षाचा कार्यकर्ता घुसला आणि गोंधळ झाला. विपक्षांना बोलण्याची संधी देणे हे भाजपासारख्या दूरदृष्टी असणाऱ्या आणि अनेक चाणक्यांचे मार्गदर्शन लाभणाऱ्या पक्षाला शोभणारे नक्कीच नव्हते. सत्तेच्या वाटेवरही काटे असतात हे भाजपा कार्यकर्त्यांना समजले तर पक्षाला अडचणीत आणणे थांबवतील.