कोरोनाच्या तिसर्या लाटेचे भाकित करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. देशाची आर्थिक स्थिती गटांगळ्या खात असली तरी जीवनावश्यक वस्तू भले महाग का होईना उपलब्ध होत असल्यामुळे त्या आघाडीवरही बातमी होण्यासारखे काही नाही. दिल्लीच्या वेशीवर शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा ससेमिरा टाळण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी गुंगारा देत आहेत. जनतेला त्याचेही आश्चर्य वाटेनासे झाले आहे. कायद्याचे रक्षक असे नाही वागणार तर कोण, अशी सांत्वनपर समजूत काडून जनता मोकळी झाली आहे. असो त्यामुळे बातमी म्हणाल तर काहीच नाही. सनसनाटी-सबसे तेज वगैरे माहितीच्या रतिबाची सवय झालेल्या तमाम जनतेला त्यामुळे कसेनुसे झाल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. अशा वेळी राजकारण्यांकडे मोर्चा वळला तर आश्चर्य नाही. त्यातच भावी युतीचे पतंग हवेत उडू लागले आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पतंग महोत्सवात भाग घेतला! या बातमीस दुजोरा दिला जात नसला तरी ढील नक्कीच दिला गेला.
वास्तविक पतंग उडवण्याचा हा मौसम अजिबात नाही. कधी पावसाची सर येईल याचा भरवसा नाही आणि अशा ओल्या वातावरणात पतंग ओलीचिंब होऊन जमिनीवरच फरफटत राहू शकते. पतंग उडवण्यासाठी हवामान अनुकूल लागते तशी तिची कंजी मोजून-मापून करावी लागते. सेना-भाजपा यांना त्या कंजीचा फॉर्म्युला उत्तम अवगत होता. परंतु मागच्या निवडणुकीत दरवेळी आपणच का फिरकी हातात धरायची असे मोठ्या भाऊ शिवसेनेला वाटले आणि त्यांनी स्वत:च पतंग उडवण्याचे मनावर घेतले. फिरकी धरायला भाजपा तयार होत नाही म्हटल्यावर बारामतीकर पुढे सरसावले आणि महाराष्ट्राच्या आकाशात तीन पक्षांचा पतंग डौलाने उडू लागला. हा पतंग कापण्याचा प्रयत्न अनेकदा भाजपावाल्यांनी केला. पण त्यांच्या मांज्याची धार बहुधा कमी झाल्यामुळे पतंग सुरक्षित राहिला! नाही म्हणायला हा पतंग अधूनमधून आजही भरकटत असतो. फिरकी धरणे आणि फिरकी घेणे यात अंतर असते हेच आपल्या नवीन मित्रांना ठाऊक नाही असे मुख्यमंत्र्यांना वाटू लागले. मग काय दादांची 72 तासांच्या डेडलाईनकडे घड्याळवाले आणि पंजेवाले डोळ्यात तेल घालून पाहू लागले. दरम्यान सिडको भवनाच्या गच्चीवरून उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे नगरविकासाचा पतंग उडवून पाहिला. तेव्हा मंत्री एकनाथ शिंदे पहातच राहिले. पण मुख्यमंत्र्यांनी काही उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही फक्त फिरकीच सांभाळा असे सांगितले नाही. चंद्रकांत दादांचे म्हणणे त्यामुळे खरे वाटू लागले. लहान-मोठ्या धुसफुसीची खरखर मांजा धरणारे हात काचत होतीच. त्यामुळे युतीचा पतंग उडणार असे उगाच वाटू लागले. पण अचानक हवा पडली, 72 तास संपले आणि मातोश्रीच्या गच्चीतून मुख्यमंत्री एकटे पतंग उडवत राहिले. यावेळी मात्र त्यांनी फिरकी लेकाकडे सोपवली होती म्हणे!