ही अ‍ॅलर्जी कशासाठी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन भाजपा जुना मित्र शिवसेनेला यांना शह देईल असे बोलले जात असले तरी स्थानिक परिस्थिती त्यास अनुकूल असेलच असे नाही. कल्याण-डोंबिवली भागातून मनसेचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आ. राजू पाटील यांनी अशा संभाव्य युतीवर फुल्ली मारली आहे. त्यांच्या मते कल्याण-डोंबिवली शहरांची वाताहात होण्यात सेना आणि भाजपा तेवढेच जबाबदार आहेत. भाजपाबद्दल आ. पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे मनसे स्वबळावरच मतदारंसमोर जाणार हे स्पष्ट होते. दरम्यान माजी आमदार कांती कोळी यांच्या शोकसभेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वबळाची भाषा सोडून आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सुरू राहील असे सूचित केले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू ठेवावा लागेल असे त्यांना वाटत आहे. ही भूमिका पक्षाने आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेशी विसंगत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसला हे बरोबर घेत नाहीत अशी नाराजी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. मुळात युती वा आघाडीचा विषय एखाद्या नेत्याने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून ठरत नसतो. त्यामागे पुढचा-मागचा बराच विचार असतो. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत मनसे-भाजपा एकत्र आले तर जसे आश्‍चर्य वाटू नये तसेच महाविकास आघाडी बारगळली म्हणून भुवया उचंवण्याची गरज नाही.
मुळात मनसे आणि भाजपा यांना एकमेकांच्या साथीची प्रचंड निकड आहे. राष्ट्रीय पक्ष आहे असा दावा करून मनसेला झिडकारणे भाजपाला परवडणारे नाही. स्थानिक निवडणुकीत स्थानिक प्रश्‍न असतात, स्थानिक अस्मितेचा मुद्दा असतो, स्थानिक नेटवर्किंग असते आणि पुढील निवडणुका जिंकण्याकरिता सुरूवातीलाच अपशकुन टाळण्याचीही गरज असते. सेना आणि भाजपा या दोघांवर आ. पाटील यांचा आक्षेप असणे आपण समजू शकतो, परंतु त्यामुळे परिस्थितीत फरक पडणार आहे काय? मनसेला जनतेला खरोखरीच न्याय द्यायचा असेल तर त्यांना एकट्याच्या बहुमत मिळवावे लागेल, असे सत्तांतर करण्याची त्यांची ताकद असेल तर प्रश्‍न नाही. परंतु तुर्तास त्यांना मनाजोगे काम करता यावे याकरिता कोणाशीतरी हातमिळवणी करावीच लागणार.
सत्तेवर असणार्‍या पक्षाला जनतेच्या रोशास सामोरे जावे लागत असतेच, अशा वेळी विरोधकांची एकजुट असेल तर मतविभागणी टळू शकते. मनसे त्यादृष्टीने विचार करण्याची शक्यता आहे.