सत्तेच्या समीकरणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले नेते मेजवान्या झोडून घरोबा करु लागतात, तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता संभ्रमित होऊन जातो. त्याला नेमकी काय भूमिका घ्यावी हे समजत नाही आणि नेते आपल्याला इतके हलक्यात कसे काय घेेऊ शकतात हा प्रश्न त्यांना छळत रहातो. एक काळ होता की मोठ्या लोकांचे मोठे राजकारण असे म्हणून हा कार्यकर्ता स्वत:ची समजूत काढून तात्पुरती का होईना या मानसिक आगतिकतेतून सुटका करुन घेत असेे. आता मात्र कार्यकर्ते बड्यांच्या या राजकारणाला उबगले असून आपला वापर होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहेत. पटले नाही नेत्याशी की पक्षांतर करुन मोकळे होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे त्याचे द्योतक! राजकारणातील ‘युज ॲण्ड थ्रो‘ नीती आता चालत नाही आणि कार्यकर्ता पूर्वीपेक्षा अधिक खंबीर भूमिका घेऊ लागला आहेे. दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. एका आमदाराला (विरोधी पक्षातल्या) सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्याने तोंडावर सुनावले, ‘तुम्ही (म्हणजे आमदार महाशय) आणि आमचे बॉस एकमेकांशी भांडत होतात तेव्हा आम्हा कार्यकर्त्यांचे बरे चालले होते. तुमच्या जवळीकीमुळे आम्ही संभ्रमात तर सापडलोच आहोत, पण आमच्या आर्थिक देवाण-घेवाणीवरही विपरीत परिणाम झाला आहे.’
असे बेधडक विधान करणारे कार्यकर्ते पूर्वी विरळ होते. आता ते मोकळेपणाने बोलू लागले आहेत. यामुळे प्रतिस्पर्धी नेत्यांकडे जेवायला जाताना कार्यकर्ते काय अर्थ काढतील याचाही विचार करण्याची वेळ आली आहे!
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांना गणपतीनंतर केव्हाही मुहूर्त लागू शकतो. रखडलेल्या महापालिका निवडणुकांमुळे इच्छुक उमेदवारांना कामच राहिलेले नाही. किती दिवस त्यांनी तरी नेत्यांच्या पालख्या वाहायच्या? कार्यकर्त्यांची नगरसेवक म्हणून सोय लागली तरच ते तृप्त होऊन आमदार-खासदारकीच्या प्रचारात सहभागी होतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना तिकिटाचे गाजर दाखवण्यात झाले, परंतु निवडणुकाच झाल्या नाहीत. म्हणजे त्यांना वापरले गेले. पण त्यांच्या हाती सत्तेच्या चार मोहरा पडतील याची दक्षता ज्येष्ठ नेत्यांनी घेतली नाही. अशावेळी हेच नेते प्रतिस्पर्ध्याकडे जेवायला जाऊ लागले तर कार्यकर्त्यांची मन:स्थिती काय होईल?
भारतीय समाज व्यक्तीपूजा मानतो. अगदी दक्षिणेत नेत्यांची देवळे वगैरे असतात तशी महाराष्ट्रात नाहीत. परंतु नेत्यांचे फोटो घरांमध्ये आणि काही जणांच्या तर चक्क देवघरात प्रतिष्ठापित आहेत! या नेत्यांचा अजेंडा वेगळा असतेो. त्यात कार्यकर्त्यांना काय वाटेल याचा विचार क्वचितच असतो. मला जे वाटते, तसे कार्यकर्त्याला वाटले पाहिजे किंवा वाटण्याइतका त्यांनी स्वतंत्र विचारच करता कामा नये, अशी भूमिका नेते घेत असतात.
महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबाबत खलबते सुरु आहेत. कार्यकर्त्याला या गोष्टी समजत असतात. नाही तरी त्यांनी जाब विचारायचा नसतो हा नियम आहे. एका बड्या नेत्याला त्याचा कार्यकर्ता प्रतिस्पर्धी नेत्याबरोबर दिसलेले आवडत नसते. त्याला जाब विचारला जातो आणि शिक्षा म्हणून तिकीटही कापले जात असते. त्यामुळे कार्यकर्ता नेत्याचे ‘पक्ष-विरोधी’ वागणे राजकीय व्युहरचना म्हणून स्वीकारायचे आणि कार्यकर्त्यांनी मात्र पक्षशिस्त मोडल्याचा बडगा सहन करायचा, अशी एकूण गत आहेे.
राजकारणी माणसांचे एक्स-रे काढले तर एक गोष्ट नक्कीच समान असेल आणि ती म्हणजे यांचे कणे प्रचंड लवचिक असतील, पण कार्यकर्त्यांचे मात्र ताठच असायला हवेत! हा भेद का? निवडणुकांचे वारे वाहू लागले की राजकीय महत्वाकांक्षांचे वादळ घोंगावू लागेल. नेते एकमेकांना टाळ्या देतील. गळ्यात गळे घालून फिरू लागतील. कार्यकर्ता कुठेतरी अडोशाला अशावेळी केविलवाणा उभा असेल. ही अवस्था होऊ द्यायची नसेल तर कार्यकर्त्यांनी दक्ष राहायला हवे, नाही तर पाचोळा होऊन जाईल!