माझे मत देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, हा विचार मनात रुजवला तर लोकशाहीने दिलेल्या या महत्वपूर्ण हक्काला कोणीही जबाबदार नागरिक वाया जाऊ देणार नाही. निवडणूक म्हटले की राजकारण येणे अपरिहार्य होते आणि त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पसंतीच्या उमेदवारास मत देऊन त्याच्यावर लोकप्रतिनिधीची जबाबदारी टाकण्याची संधी मिळत असते.
यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. भाजपाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता अबाधित ठेवायची आहे तर विरोधकांना त्यांचे मनसुबे उधळायचे आहेत. या राजकीय स्पर्धेने अवघा देश गेले वर्षभर ढवळून निघाला होता आणि आता उभयतांपैकी कोणाकडे सत्तेचे सुकाणू द्यावे याचा फैसला करण्याचा मतदानाचा दिवस उजाडला आहे. जातीपातीला अवास्तव महत्त्व मिळणार की विकासाला प्राधान्य, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करताना महागाई, बेरोजगारी या समस्यांवर मात करणारे खासदार संसदेत पाठवायचे याचा फैसला करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरायला हवे. कमी मतदान लोकशाहीला कमीपणा आणत असते आणि नागरिक म्हणून आपली उदासीनता सिद्ध करीत असते. तसे होऊ नये हीच अपेक्षा.