अखेरीस जे घडायला नको होते तेच झाले. कळव्याच्या डोंगरात वसलेल्या घोलाईनगर वसाहतीवर दरड कोसळून चौघांचा बळी गेला आणि तीन वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या दुर्घटनची आठवण ताजी झाली. गेल्या तीन वर्षांत दुर्घटनेची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत आणि ताज्या घटनेमुळे काही उपाययोजना होतील, ही अपेक्षाही बाळगणे मूर्खपणाचे ठरेल. प्राथमिक सुविधा पुरविणारी ठाणे महापालिका वन खात्याकडे बोट दाखवेल कारण ही वसाहत त्यांच्या जागेवर आहे तर वन खाते आपल्या कर्तव्यकसुरतेचे खापर महापालिकेवर फोडेल कारण अतिक्रमित घरांना सुविधा देण्याचे किंवा करवसुली करण्याचे बेकायदेशीर कृत्य त्यांना कारवाई करण्यापासून रोखत आले आहे. या दोन संस्थांच्या भांडणाचा लाभ राजकारण्यांनी घेतला नाही तरच नवल. कारण काही झाले तरी ते त्यांचे मतदार ‘माय-बाप’ असतात! त्यामुळे अतिक्रमण हटवणे त्यांना कसे मंजूर व्हायचे? त्यामुळे ज्यांचे मरण होते त्यांच्याबद्दल कोरडी सहानुभूती दाखवण्याखेरीज काही होईल असे वाटत नाही.
कळवा-मुंब्रा भागातील डोंगरावरील वसाहती वाढण्याची प्रक्रिया काल-परवाची नाही. ज्या घोलाईनगरमध्ये ताजी दुर्घटना घडली, तिथेच भास्करनगर, पौंडपाडा आणि वाघोबानगर वसाहती आहेत. त्यांच्यावरही अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचे सावट आहे. नेमका असाच प्रकार तीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या मुंब्रा येथील ठाकूरपाडा, हनुमाननगर, शिवाजीनगर आणि संजयनगर भागात होऊ शकतो. वागळे इस्टेट येथे मामा-भाच्याच्या डोंगरावर वसलेले रुपादेवी पाडा असो की येऊरच्या डोंगरावर वाढू लागलेली अतिक्रमणे असोत, सर्वच भागांत झोपडपट्ट्यांचा विळखा आहे. या सर्व डोंगराळ भागात किमान दोन ते अडीच लाख लोक रहात आहेत त्यापैकी काही मंडळी महापालिकेचे करदातेही आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची नैतिक जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्या दुर्घटनांचे आपण समजू शकतो, परंतु मानवनिर्मित आपत्तीचे काय? ठाणे महापालिका, वन खाते आणि काही प्रमाणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना आपापल्या अधिकारक्षेत्रात कायमस्वरूपी उपाययोजना करावीच लागेल. या कार्यात राजकारण्यांनी निःपक्षपातीपणे हस्तेक्षेप करण्याची गरज आहे. मानवतावादाचा मुद्दा उपस्थित करून या गंभीर विषयाला बगल देण्याचा अश्लाघ्य प्रकार करू नये म्हणजे मिळवले. जनतेने राजकारणी आणि प्रशासनाच्या हातातले खेळणे होणे कधी थांबवायला हवे. तेव्हाच हा जीवघेणा खेळ थांबू शकेल.