ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या 39 पोलिस कर्मचाऱ्यांच्या आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तडकाफडकी बदल्या केल्यामुळे खात्यात खळबळ उडाली आहे. अशी काही कारवाई होत असते यावर सर्वसामान्य ठाणेकरांचा तर केव्हाच विश्वास उडाला होता. किंबहुना कसेही वागलो तरी आपल्यावर कोणाचे लक्ष नसते हा गोड गैरसमज दूर झाला आहे. भविष्यात पोलीस जबाबदारीने वागतील ही अपेक्षा आहे.
श्री. डुंबरे यांनी पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्याच्या दिवसापासून त्यांनी बारकाईने आपल्या कर्मचार्यांच्या त्रुटींचा अंदाज घेण्यास सुरुवात केली. त्यांचा या शहराचा अभ्यास तयार होताच, त्यामुळे जास्त वेळ न दवडता ते ‘अॅक्शन मोड’मध्ये गेले. खात्यांतर्गत चर्चा-बैठका घेता-घेता त्यांनी प्रतिष्ठित नागरीकांकडून माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यातून त्यांना जनतेच्या अपेक्षांचा अंदाज बांधता आला. शिळफाटा भागातील सततची वाहतूक कोंडी आणि पोलिसांची कामगिरी यामध्ये त्यांना तफावत आढळली. ही औपचारिकता नव्याने कार्यभार स्वीकारणार्या अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे काम केले तर पाळली जाते परंतु जे अधिकारी केवळ शिक्षा म्हणून कार्यभार स्वीकारतात ते बदलीच्या प्रतिक्षेत कर्तव्याच्या आघाडीवर शून्य ठरतात. श्री. डुंबरे हे अशा अधिकाऱ्यांपैकी नसल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.
वाहतुकीची समस्या आयुक्तालयातील प्रत्येक परिमंडळासाठी डोकेदुखीचा विषय बनली आहे. तशी तक्रार पोलिस आयुक्तांकडे होतीच. त्यांनी अधिक वेळ न दवडता खातरजमा केली आणि कारवाईचे पाऊल उचलले. अशा कारवाईची जनतेला प्रतिक्षा होती. कारण पोलीस खात्यात एक सुस्तावलेपणा आला होता. यापुढे खात्यात काही दिलासाजनक बदल होऊ लागतील. ही अपेक्षा बाळगता येऊ शकेल.
वाहतूक शाखेचा जनसामान्यांशी अधिक संबंध येत असतो. जनतेसाठी तो जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोजची वाहतूक कोंडी असो की रिक्षाचालकांचा आडमुठेपणा, नियमांचे उल्लंघन असो की सिग्नल यंत्रणेतील बिघाड, या सर्वांचा ताप नागरिकांना होत असतो. त्यापैकी ज्या बाबी वाहतूक पोलीस सक्रीय असतील तर सुटू शकतात याची यादी श्री. डुंबरे यांनी बनवली असणार. ती अंमलात आली तर वाहतूक व्यवस्थेत अनुकूल बदल होतील. अवजड वाहनांचा शहरात प्रवेश, गॅरेजेसचे अतिक्रमण, शेअर रिक्षांच्या नावाखाली होणारा हैदोस, लेन-कटिंग आदी समस्यांबाबत श्री. डुंबरे यांना लक्ष घालावे लागेल. शिळच्या कारवाईमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना योग्य तो संदेश गेला असेल. केवळ वाहतूक शाखाच नव्हे तर अन्य विभागांतही पोलिसांचे काम लोकभिमुख असायला हवे. पोलिसांबद्दल भीती वाटण्याऐवजी आदरयुक्त जिव्हाळा वाटायला हवा. प्रत्येक वेळी कारवाईचा बडगा उगारणाऱ्यांपैकी श्री. डुंबरे नाहीत. ज्याअर्थी त्यांनी हे पाऊल उचलले त्याअर्थी परिस्थिती खरोखरीच हाताबाहेर गेली असणार. ठाणे पोलिसांवर जरब बसवण्याचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे.