औरंगाबदेत उद्योजकांवर सातत्याने होणारे हल्ले निश्चितच चिंताजनक आहेत. भोगले उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद भोगले आणि अन्य दोन वरिष्ठ अधिकार्यांना 15-20 गुडांनी बेदम मारहाण केली. यामुळे राज्यातील उद्योजकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दहशतीचे हे लोण अन्य भागात पसरू नये याकरिता तातडीने कारवाई सरकारने करावी अशी अपेक्षा आहे.
औद्योगिक क्षेत्रात अशा प्रकारची हिंसा होणे महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारी तर नाहीच, परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक स्थितीत ती नवीन संकटांची भर घालू शकते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात उसळलेली कामगार क्षेत्रातील अशांतता अनेक उद्योगधंद्याच्या स्थलांतरास कारणीभूत ठरली होती. गुजरात-कर्नाटक आदी राज्यांत आपले सुस्थितीत असंख्य उद्योग गेले. हा आगडोंब भरुन न येणारे नुकसार करू गेला. यामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले होते. त्या घटनांचे व्रण आजही पुसले गेलेले नाहीत. देधोधडीला लागलेली कुटुंबे त्यातून सावरली नाहीत. त्यामुळे अनेक गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. त्या सर्व घटनांची पुनर्रावृत्ती होणे आता परवडणारे नाही. त्यामुळे या अनुचित प्रकाराची तातडीने दखल घेऊन कारवाई होणे गरजेचे ठरते.
नवीन गुंतवणूक येण्यासाठी उद्योग-स्नेही वातावरण असावे लागते. सरकारची धोरणे त्यास जितकी कारणीभूत असतात तितकीच सामाजिक मानसिकता. त्यात कारखानदार आणि कामगार नेते यांचा समावेश होता. सकारात्मकतेचा अभाव वातावरण गढूळ करू शकतो आणि गैरसमजुतीस कारण. याकरिता सरकारतर्फे संघर्षाची धार बोथट कशी होईल याकरिता समन्वय आणि संवाद हे मार्ग अवलंबिले जायला हवेत. हिंसा करणार्यांवर पोलिस कारवाई झाली तर योग्य संदेश नक्कीच जाईल, परंतु हे प्रकार समूळ नाहीसे व्हावे असे वाटत असेल तर संवादाचाच मार्ग स्वीकारायला हवा.
हिंसाचाराच्या घटनांमुळे नवीन गुंतवणुकीवरही विपरित परिणाम होऊ शकतो. नवे उद्योग आले तर नवीन रोजगार निर्मिती होईल आणि कोरोनामुळे पसरलेले आर्थिक संकट दूर होऊ शकेल. हिंसाचार करणार्या मंडळींना त्यांच्या कृत्याचे दूरगामी परिणाम किती वाईट आहेत हे समजावून सांगावे लागेल.