श्रीमंत देश गरीब जनता!

अलिकडे सुखद बातमी वाचायला मिळणे तसे दुर्मिळच झाले आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या बातमी वाचून सुटकेचा निःश्‍वास टाकतो ना टाकतो तोवर तिसर्‍या लाटेचा इशारा देऊन क्षणभराच्या आनंदावरही विरजण घालण्याचा कोण विकृत आनंद माध्यमांना आणि सरकारी यंत्रणेला मिळतो हे तेच जाणोत. तर अशा या चारही बाजूंनी उदास वातावरणात स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी तिपटीने वाढल्याची गोड बातमी प्रसिद्ध झाली आहे. भले त्यापैकी एकही दमडी आपली नसली तरी भारतीय म्हणुन अभिमान वाटण्याची भावना कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
भारतीय व्यक्ती आणि कंपन्या यांनी २०२० अखेर पर्यंत गुंतवलेला निधी २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्शत २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे स्वित्झरर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने अधिकृतपणे घोषित केले आहे. यामुळे तमाम भारतीय नागरीक भले गरीबीचे चटक सहन करीत असले तरी आपण मात्र गरीब देशाचे नागरीक नाही असा दिलासा त्यांना या बातमीमुळे निश्चित मिळाला असेल! ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है,’ या एका जुन्या गाण्यातील पंक्ती बदलून ‘हम गरीब है तो क्या पैसेवाले है’ असे गात निदान एक दिवस का होईना सुखाची झोप घेऊ शकतील!
एकीकडे दोन वेळचे पोटभर अन्नाची वानवा, डोक्यावर छप्पर नाही की अंगावर घालायला धड कापड नाही, अशी बिकट अवस्था असणार्‍या या देशाचे हे दुसर्‍या टोकाचे चित्र गोंधळात टाकणारे असले तरी विलाभनीय मात्र नक्की आहे. ज्या देशात तीन टक्के लोक आयकर भरतात, जिथे ९० टक्के संपत्ती ३० टक्के नागरिकांच्या हाती आहे, जिथे कोट्यधिशांची संख्या वाढत असली तरी गरीब-श्रीमंत दरीही रुंद होत आहे, अशा विसंगतीने भरलेल्या देशात स्विस बँकेत एवढे पैसे असले तर नवल वाटण्याची गरज नाही. प्रश्‍न इतकाच आहे की, स्विस बँकेतून बेनामी पैसे भारतात आणण्याच्या राणा भीमदेवी आरोळीचे काय झाले?
आज देशासमोर आर्थिक संकट आ वासून उभे आहे. महागाई वाढत चालली आहे तर चलनफुगवटा कमी होण्याचे नाव घेत नाही. बेरोजगारीचे प्रमाण गगनाला भिडत चालले आहे तर उत्पादन क्षेत्रात घसरगुंडी झाली आहे. पोटाची खळगी भरण्याचा यक्षप्रश्‍न जनतेसमोर असताना स्विस बँकेतील भारतीय निधी तिप्पट झाल्याची बातमी धडकली आहे. एकीकडे स्विस बँकेतील ही पुंजी आणि देशातील प्रमुख देवस्थानांमध्ये जमा असलेला कोट्यवधी रुपयांचा खजिना यांचा विचार करता भारताला गरीब देश म्हणणे चुकीचे ठरेल! देश श्रीमंत पण जनता गरीब अशी विसंगती पुढे आली आहे. ‘मेरा भारत महान’ असा जप करीत गरीबीताईने श्रीमंत होण्याचे स्वप्न भले रिकाम्या पोटी पहायला हरकत नाही!