खेळात हारजीत ही होतच असते. परंतु हरल्यावर चुका सुधारून जिंकण्याचे प्रयत्न करणे म्हणजे प्रामाणिकपणा. भारतीय क्रिकेट संघचा टी-२० विश्वचषक स्पर्धेत ज्या पद्धतीचा खेळ झाला, तो पहाता चमूतील प्रत्येक क्रिकेटपटुने जाहीरातींचे मॉडेलिंग करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, असे क्रिकेटरसिकांना वाटत आहे. प्रत्यक्षात मात्र हा पराभव फार मनाला लागलेला दिसत नाही. त्यामुळे संघातील एक खेळाडू अवैध मार्गाने कोट्यवधी रुपये किंमतीचे घड्याळ देशात आणल्याप्रकरणी गोत्यात आला आहे. हे घड्याळ पाच कोटींचे नसून दिड कोटींचे आहे, असे निलाजरेपणाने हा खेळाडू बोलला तेव्हा देशाचा पराभव त्याच्या खिचगणतीतही नसल्याचा निर्वाळा आला! एरवी संघ विजयी झाला असता तर त्याचे हेच घड्याळ विमानतळ अधिकाऱ्यांनी पाहून न पाहिल्यासारखे केले असते.
ज्या संघाला न्हवते आता भल्याभल्यांना कठीण होते तिथे आपल्या संघाची दाणादाण उडाली!असे एकाहून एक तगडे खेळाडू होते असताना घड्याळाऐवजी विश्वचषकच अआणायला हवा होता. परंतु पैशांमागे धावू लागणाऱ्या खेळाडूंची आयपीएलमुळे इतकी दमछाक झाली की देशासाठी खेळताना त्यांच्या मनगटात आणि पायात जोरच नाही राहिला नाही. वास्तविक टी-२० साठी लागणारा सराव आयपीएलमुळे आयता मिळत असताना भारतीय क्रिकेटपटूंना जिंकणे कठीणच नव्हते.परंतु जी काही हाराकिरी संघाने केली ती पाहून ‘मेरा देश महान’ वगैरे गोष्टींवर त्यांचा विश्वास राहिला नसावा याचीच प्रचिती येते. क्रिकेटपटूंचे अन्य खेळाडूंच्या तुलनेत फाजिल लाड होत असतात, ही ओरड जुनीच आहे. भारतीय क्रिकेट संघ जिंकला की त्याच्यावर बक्षिसांचा जो वर्षाव होतो तो पाहून खो-खो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस आदी खेळांत प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सापत्न वागणुकीचा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. कोणी बंगले भेट देतो तर कोणी महागड्या गाड्या. एका महान खेळाडूच्या आयात केलेल्या गाडीवर कर न आकारण्याची मेहेरनजर करण्यात आली होती. तिथे एखादे घड्याळ ‘तसेच’ आणले तर एवढा गहजब का? असा निर्लज्ज प्रश्न विचारणाऱ्यानी संबंधित क्रिकेटपटूने देशासाठी या स्पर्धेत काय योगदान दिले होते, असा खरे तर प्रश्न विचारायला हवा. पण तसे होत नसते.
क्रिकेटपटूंना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ देण्याची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, त्यांना जाब विचारणे म्हणजे त्यांच्या राष्ट्रीयत्वावर शंका घेण्यासारखे वाटू लागते.
खेळाडूंना पैसा मिळाल्याचे दुःख नाही. ते आपल्याला आनंद देतात तर त्यांनाही आनंदी होण्याचा अधिकार आहे. परंतु कायदा हातात घेऊन कोणीही कसे वागावे याचे समर्थन करता येणार नाही. मग तो क्रिकेटपटू असला तरी. म्हणुनच त्याचा ‘हार्दिक’ निषेधच व्हायला हवा.