व्होट-बँक आशीर्वादांची

भाजपा नेतृत्वाचा प्रत्येक निर्णय, बारीक-सारीक हालचाली आणि मोठे कार्यक्रमाचे (ईव्हेन्ट) आयोजन या सर्वामागे एक सुप्त हेतू असतो. विरोधक त्यास छुपा अजेंडा असेही संबोधतात. परंतु भाजपाचे नेते त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत आणि आपली भूमिका पुढे रेटतात. जन आशीर्वाद यात्रेमागेही काही योजना नसेल असे आता कोणी मानणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेल्या मंत्र्यांच्या खांद्यावर या अंतस्थत: प्रयोजनाचा बोजा असला तर नवल वाटू नये. ठाण्याच्या वाट्याला प्रथमच आकेके केंद्रीय मंत्रिपद ही ऐतिहासिक घटना ठरते आणि त्यामुळे केंद्रीय पंचायत राज्यमंत्रिपदाची धुरा वाहणारे खा. कपिल पाटील यांच्याकडून पक्षश्रेष्ठींच्या त्यांच्या खात्यातील जबाबदारी बाहेरही काही अपेक्षा असणार. यानिमित्ताने भाजपाने खा. पाटील यांचे जे जंगी स्वागत केले ते पहाता जनआशीर्वाद यात्रेने शक्तीप्रदर्शनाचा छुपा डाव साधला असे म्हटले तर वावगे ठरू नये.

गेल्या काही वर्षात भाजपा आक्रमक झाला असेल तर त्याचे श्रेय निसंदिग्धपणे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि अमित शाह यांना द्यावे लागेल. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर भाजपाला आपणच मोठे भाऊ आहोत असे शिवसेनेला ठासून सांगायचे असते. हे दाखवून देण्यासाठी एकही संधी ते दडवत नसतात. मग जनआशीर्वाद यात्रेचा पुरेपूर उपयोग झाला नाही तरच नवल. हा आक्रमकपणा युती फुटल्यावर वाढला आहे. राज्यपातळीवर तो दररोज वर्तमानपत्रांच्या मथळ्यामुळे प्रकर्षाने लक्षात येत असतो. परंतु स्थानिक पातळीवर आणि खास करुन आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता तो गल्लीबोळातही ओसांडला तर आश्‍चर्य वाटू नये. ठाण्यात निघालेल्या जनआशीर्वाद यात्रेस मिळलेला प्रतिसाद आणि गेले काही दिवस पक्षाने निर्माण केलेला माहोल त्याची प्रचिती देत होती. शिवसेनेला आपण जुमानत नाही असा संदेशच जणू या वातावरणनिर्मितीतून पसरवण्यात आल्याचे जाणवले.

भाजपाचे मंत्रिमंडळातील नियुक्त्या करताना सोशल इंजिनिअरिंगचा खुबीने वापर केला होता. खा. पाटील ज्या आगरी समाजातून येतात त्यांचे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात प्राबल्य आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाची व्होट-बँक स्थापन करण्याचा हेतू या यात्रेत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.