रक्त वाया जाऊ नये!

आपल्या देशात रक्तदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरे भरवण्याकडे सामाजिक संस्थांचा नेहमीच कल असतो. आपण समाजाच्या काहीतरी उपयोगास यावे ही भावना अनेक नागरीकांना रक्तदान करण्यासाठी आकर्षित करीत असते. आर्थिक स्वरुपात मदत करणारेही रक्तदानास कधी नाही म्हणत नसतात. त्यामुळे पैसे नसणारेच हा मार्ग स्वीकारतात असे नाही. सहिष्णुता आणि परोपकार या मूल्यांचे संस्कार लहान वयातच रुजवले जात असल्याने रक्तदानाकडे आपसुक पसंती वाढत आहे. मृत्यूशी झुंजणार्‍या आपल्या बांधवांना रक्त देण्यासारखे पवित्र कार्य नाही या दृढ विश्‍वासातून रक्तदान शिबीरे भरवली जात असतात. परंतु एका ताज्या आकडेवारीनुसार सुमारे ६५ हजार लिटर रक्त वाया गेल्यामुळे एकुणच रक्तदान शिबिरांच्या प्रयोजनाबाबत शंका घेतली जाऊ लागली आहे.
कोरोना संसर्गामुळे राज्यात रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली आणि मग रक्तदान शिबीरांचे जणू पेवच फुटले. नागरीकांनीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला. हजारो लिटर रक्त रक्तपेढ्यांमध्ये जमा झाले. परंतु ताज्या रक्ताची मागणी असल्यामुळे जमा असलेल्या रक्ताचा मोठा साठा कालबाह्य झाला. रक्त दूषित वा संसर्गित नव्हते. परंतु त्याला मागणीच नसल्यामुळे ते पडून राहिले आणि अखेरीस वाया गेले.
दरवर्षी सुमारे ११ते १२ हजार लिटर रक्त गेल्या पाच वर्षांपासून वाया जात आहे. तांबड्या पेशीही वाया गेल्या. हा प्रकार गंभीर आहे कारण भविष्यात होणार्‍या रक्तदान शिबीरांवर त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. आपल्या रक्ताला किंमत नाही असा गैरसमज दृढ होणे या सत्कार्यासाठी पुढे येणार्‍यांच्या मनात तयार झाला तर बिकट परिस्थीती ओढावू शकते. मुळात असा गोंधळ का झाला? तो टाळता आला नसता काय? असे प्रश्‍न यानिमित्ताने उद्भवतात. रक्तपेढ्यांमधील नियोजनाचा मुद्दा प्रामुख्याने विचारात घ्यावा लागेल. या पेढ्यांमधील अतिरिक्त रक्त गरजू पेढ्यांना देण्यात टाळाटाळ झाली होती काय, अशाही प्रश्‍न उपस्थित होतो. रक्तदान शिबिरे भरवताना भावनात्मक दृष्टीकोन सर्वसाधारणपणे असतो. परंतु त्यापेक्षा अधिक शास्त्रशुध्द पध्दतीने विचार होण्याची गरज आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि गरज लक्षात घेऊन झाले तर व्यवहार्य ठरेल. अमक्याने इतक्या पिशव्या जमवल्या म्हणुन आपण त्यापेक्षा जास्त रक्त जमवले पाहिजे, ही अममहमिका आणि श्रेयवादाची लढाई यामुळे रक्तदानाचे पावित्र्य कमी होत आहे.