मोदींच्या सभेनंतर………

ठाणे आणि कल्याण मतदारसंघांवर महाराष्ट्राचे विशेष लक्ष राहणार हे गृहीत धरले होतेच आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा या दोनपैकी एका ठिकाणी होणे स्वाभाविक होते. मोदींच्या सभेचा धुरळा खाली बसत नाही तोच महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा एका मतदारसंघात हॅटट्रिकच्या प्रयत्नात असताना मोदी न येते तरच नवल! दुसरीकडे मोठ्या अट्टाहासाने मुख्यमंत्र्यांनी ठाण्याची जागा मागून घेतल्यामुळे ‘बालेकिल्ल्यात’ कोणताही धोका होणार नाही याची काळजी घेतली गेली. अर्थात कल्याणपेक्षा मोदींची सभा ठाण्यात होणे एकूण जमिनी स्थिती पाहिली तर बरे झाले असते. ठाण्यात शिंदे हेच रिंगणात आहेत असा प्रचार शिवसेनेतर्फे केला जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी कल्याण आणि शेजारच्या भिवंडी मतदारसंघासाठी आपला अमूल्य वेळ दिला असावा. मोदींच्या सभेमुळे ठाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले असते आणि ते अधिक (?) जोमाने कामाला लागले असते.

गेले दोन दिवस पक्षाचे प्रदेशनेते कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपा कार्यालयात बैठका घेत आहेत. ही बातमी खरी असली तर ती शिवसेना उमेदवारासाठी चांगली नाही. सेना-भाजपा दरी जागावाटपावरून रुंदावली आणि प्रचारातील त्यांचा तुटपुंजा सहभाग त्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करीत आहे. पक्षांतर्गत खदखद सर्वत्रच असते. त्याचा त्रास प्रत्येक उमेदवाराला होत असतो. नरेश म्हस्के यांना भाजपाचे सहकार्य मिळवण्याचे आव्हान तर होतेच पण काही प्रमाणात स्वकीयांचा तटस्थपणा प्रचाराच्या गतीवर विपरीत परिणाम करू पाहत आहे. श्री. म्हस्के व्यक्तीगत संबंधातून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तुलनेने राजन विचारे यांना पक्षांतर्गत कलहांना सामोरे जावे लागले नाही. त्याचे कारण ते एकटेच निवडणुकीसाठी इच्छुक होते. ही जमेची बाजू आणि प्रतिस्पर्धी गोटातील कुरबुरींमुळे होणारी मतविभागणी यावर ते अवलंबून असणार. अशा निवडणुकीत पैसा हा मोठा आणि प्रसंगी निर्णायक घटक ठरतो. श्री. विचारे यांना पूर्वीच्या निवडणुका या कसोटीवर तशा सोप्या गेल्या. २०१४ मध्ये मोदी लाटेने त्यांना तारले तर २०१९ पुलवामा मदतीला धावून आले. २०२४ मध्ये ते उद्धव ठाकरे-शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती मतांमध्ये कशी रूपांतरित करावी या विवंचनेत असणार. विषय भले कितीही भावनात्मक झाला तरी काही ठिकाणी पैसाच जादू करीत असतो. श्री.विचारे हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि गाठीशी पूर्वानुभव आहे. त्यामुळे ते हा प्रश्न योग्य प्रकारे हाताळत असावेत, असे वाटते.

या निवडणुकीत ध्रुवीकरण होणार यात वाद नाही. पंतप्रधानांच्या भाषणावरून तसे संकेत मिळू लागले आहेत. ठाणे, कल्याण आणि भिवंडी मतदारसंघात अल्पसंख्याक मतदानाचे प्रमाण लक्षणीय आहे. ठाण्यापुरते बोलायचे झाले तर हा आकडा २.९८ लाख आहे. विचारे यांचे पारडे त्यामुळे जड झाले तर आश्चर्य वाटू नये. त्यासाठी अन्य मतपेढ्या, विशेषतः हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रापर्यंत येतील याची खबरदारी महायुतीला घ्यावी लागणार. मोदींच्या सभेचा महाआघाडीला अप्रत्यक्ष फायदा झाला तर आश्चर्य वाटू नये.