स्वातंत्र्याची किंमत

अभिनेत्री कंगना रणावट हिने १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही ब्रिटिशांनी दिलेली भीक होती असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. तिला देण्यात आलेला पद्म पुरस्कार परत मागून घ्या ते तिला देशद्रोही असल्याचे जाहीर करा अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सुशांत सिंग राजपूत संशयास्पद आत्महत्या प्रकरणी तिने अशीच भूमिका घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेही असेल कदाचित पण तिच्या ताज्या विधानाची काही मंडळी नोंद घेत नसून त्याकडे पब्लिसिटी स्टंट म्हणुन ते पहात आहेत. असे असताना कंगनाला मराठी आणि हिंदी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले यांच्या रुपात तगडा पाठीराखा मिळाला आहे. त्यांनी कंगनाच्या मताशी सहमती व्यक्त करून स्वातंत्र्यपूर्व काळातील बड्या नेत्यांच्या आणि समाजातील प्रतिष्ठीत वर्गाच्या वर्तनाबद्दलही शंका व्यक्त केली आहे. हजारो स्वातंत्र्यसैनिक हसत-हसत फासावर जात असतात हे नेते काय करीत होते? असा खडा सवाल श्री. गोखले यांनी उपस्थित केला आहे.

कंगना आणि श्री.गोखले यांच्या विधानांकडे राजकीय चष्म्यातून पूर्वग्रहदूषित दृष्टीने पहाण्यापूर्वी मुळातच जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले त्याची आपण काय पत्रास ठेवतो? त्याला योग्य मान देतो काय? स्वतंत्र देशाचे नागरीक म्हणुन आपण त्यास योग्य न्याय देतो काय, असे प्रश्‍न विचारायला हवेत. जे स्वातंत्र्य हजारो लोकांच्या बलिदानामुळे मिळाले आहे आणि ते आपणे मोठ्या संघर्षाने कमावले आहे तर त्याला इतके कमी का लेखले जावे? कंगनाचे म्हणणे भलेही पटले नाही तरी स्वातंत्र्य जणू भीकेतून मिळाले आहे असे कृतीतून करून दाखवत आहेत, कंगनाने एक प्रकारे अशा मंडळींच्या मर्यावर बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत स्वैराचाराने वागून आपण चुकवत असू तर तो शुध्द कृतघ्नपणा ठरतो. कंगनाचे बेधडक विधान असो की श्री. गोखले यांच्या विचारपूर्वक म्हणण्यातील भावार्थ असो,तो लक्षात घेऊन आपल्या वर्तनात सुधार करणे आणि जबाबदार नागरीक म्हणुन कर्तव्यांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल.
स्वातंत्र्य भीकेत देण्याइतके ब्रिटिश इतके श्रीमंत खचितच नव्हते आणि भारतीय म्हणुन अशी भीक आपण स्वीकारण्याइतके गरीबही नाही. त्यात स्वाभिमानाचा भाग आलाच.त्यामुळे कंगनाच्या विचाराची दुसरी बाजू, लक्षात घ्यायला हवी. तिच्या ट्रॅक-रेकॉर्ड तिच्याबद्दल चुकीचे संकेत देत असतो. पण जबाबदार नागरीक म्हणुन स्वातंत्र्याची किंमत कशी वाढत राहील यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.