उमेद वाढवणारी ‘उमंग’!

थोडी कल्पकता दाखवली आणि बारीक लक्ष घातले तर अपेक्षित परिणाम मिळू शकतात. ठाणे जिल्हा परिषदेने त्यांच्या शाळांतील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आणि त्याचा समाधानकारक परिणाम दिसू लागला. याचे श्रेय जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना आणि शिक्षण विभागाला द्यावे लागेलच, परंतु जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांनी जातीने त्यात रस घेतल्यामुळेच बदल दिसून आला.

‘उमंग अभियान 2022’ या 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल दिसू लागला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये तसेच मूलभूत साक्षरतेमध्ये प्रगती झाल्याचे दिसले. कोरोनामुळे मागील दोन वर्षात सर्वाधिक झळ शिक्षण विभागाला बसली होती. आभासी शिक्षणाने शैक्षणिक प्रक्रियेत खंड पडू दिला नाही याचे फसवे समाधान शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांना जरूर झाला असेल, परंतु प्रत्यक्षात मुलांचा विकास खुंटला असल्याचे विदारक चित्र पुढे आले होते. पहिली ते तिसरी मधील भाषा विषयांतील विद्यार्थ्यांच्या आकलनाचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की २२.७९ टक्के मुलांना अक्षर ओळख नव्हती. गणिताची अंकओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८.१९ होती, ती आता २.२९ टक्क्यांवर आली आहे. भाषेच्या बाबतीत १८.७१ टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
उमंग अभियानांतर्गत भाषा आणि गणित विषयांचा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची निर्मिती करून ती पीडीएफ स्वरूपात शाळाशाळांत पोहोचवण्यात आली. दोन टप्प्यात या अभियानाची आखणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. त्यासाठी पूर्वचाचणी घेण्यात आली. त्यानुसार कार्यवाहीची दिशा ठरली आणि स्वतंत्र वेळापत्रकाद्वारे प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष दिले गेले. इतके प्रामाणिक प्रयत्न केल्यावर अनुकूल परिणाम लाभला नसता तरच नवल.

सर्वसाधारणपणे महापालिका असो वा जिल्हा परिषद शाळा, यांच्याबद्दल फार चांगला अभिप्राय खचितच मिळत असतो. पगार घेऊन पाट्या टाकणारे शिक्षक अशा शेलक्या शब्दात त्यांच्यावर टीकाही होत असते. परंतु ठाणे जिल्हा परिषदेने हा समज पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनावर समाजाने मात जरूर केली, परंतु शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या पिछेहाटीवर फारसे काम होत नव्हते. ठाणे जिल्हा परिषदेने त्यादृष्टीने एक अनुकरणीय असा वस्तुपाठ समोर ठेवला आहे. त्याबद्दल या अभियानाशी निगडीत सर्वांचे अभिनंदन आणि असेच स्तुत्य उपक्रम राबवतील यासाठी शुभेच्छा!