रुपयाचे अवमूल्यन, वाढता चलन फुगवटा, मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या पारंपारिक बँक मुदतठेवींवर घटलेले व्याजदर आणि एकुणातच आर्थिक अनिश्चितता या चक्रव्युहात फसलेल्या सर्वसामान्य नागरीकांचे पाय शेअर मार्केटच्या दिशेकडे वळले. कोरोना काळात शेअर बाजार भलताच वधारला याचे कारण या नवगुंतवणुकदारांनी दाखवलेला रस. एका दिवसांत अदानी उद्योग समुहाच्या शेअर्सचे मूल्य 1.03 लाख कोटींनी घसरल्यामुळे आता कुठे रस घेऊ लागलेल्या गुंतवणुकदारांना या नव्या प्रांतात येणे चुकीचे तर झाले नाही ना अशी शंका आली असेल तर नवल नाही.
नव्वदच्या दशकात संपूर्ण देश हादरवणार्या हर्षद मेहता घोटाळ्याच्या आठवणी सोमवारी जाग्या झाल्या. हर्षद मेहता घोटाळा शोधून काढणार्या पत्रकार सुचेता दलाल यांनीच समाज माध्यमावर एक सुचक इशारा दिला आणि बघता-बघता काही तासांतच अदानीचे शेअर कोसळले. आशियातील सर्वाधिक श्रीमंत गृहस्थांमध्ये दुसरा क्रमांक पटकवणारे गौतम अदानी यांच्या कंपन्यांत डोळे झाकून पैसे गुंतवले जात असतात. परंतु दलालबाईंच्या ट्वीटने गोंधळ उडवला आणि अदानी समुहाच्या सहापैकी पाच कंपन्यांच्या शेअर्सवर तर लोअर सर्किट लागले. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने अदानी समुहातील गुंतवणूक करणार्या तीन कंपन्यांवर कारवाईही केली. त्यांची खाती गोठवली. या सर्व घडामोडी आता कुठे चंचूप्रवेश करू पहाणार्या गुंतवणुकदारांच्या आकलनाबाहेरच्या होत्या. त्यांची रक्कम भले शुल्लक असेल पण कष्टाने कमावलेला पैसा गमवणे त्याला परवडणारे नव्हते. अशा गुंतवणुकदारांचे या बड्या मंडळींच्या लाखो कोटींच्या ‘संशयास्पद’ व्यवहारामुळे खच्चीकरण झाले नाही तरच नवल.
कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या. अनेकांना निम्म्या पगारावर काम करावे लागत आहे. अशा वेळी काटकसर आणि गुंतवणुकीचे नवे पर्याय या दोन मार्गांचा अवलंब झाला. मध्यमवर्ग कनिष्ठ मध्यमवर्गीय तर कनिष्ठ आणखी गरीबीच्या खाईत लोटला गेला. सध्या ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणे सोपे झाले आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे गुंतवणुकदारांना हे व्यवहार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला आहे. विशेष म्हणजे महिला गुंतवणूकदारांचे प्रमाणही वाढले आहे. पैशाला कामाला लावा किंवा पैसाच पैसा कमवतो या सिद्धांतांवर जनतेचा विश्वास वाढू लागला आहे. शेअरमार्केटमधील या आश्वासक चित्राला सोमवारी तडा गेला. व्यवहारांवर देखरेख ठेवणार्या संस्थांनी जनतेचा विश्वास कमकुवत होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. शेअर मार्केट अर्थकारण सावरू शकते, हे लक्षात घ्यायला हवे.